महापालिकेचे ३ कोटी १ लाख रुपयाचे शिल्लकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या सभेत सभापती नंदू नागरकर यांनी आज सादर केले. शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांवर भरमसाठ कर या अंदाजपत्रकात लागू करण्यात आला असून त्या तुलनेत कुठलीही सुविधा शहरवासियांना देण्यात आलेली नाही. भूमिगत गटार योजना आणि मुख्य रस्त्यांच्या कामाला कधी सुरुवात होणार याचे उत्तर स्वत: सभापतींकडे नसल्याची माहिती त्यांच्या पत्रकार परिषदेतून समोर आली. दरम्यान, शहराची सीमा वाढणार असल्याने शहर वाहतूक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थायी समितीच्या सभेत सभापती नंदू नागरकर यांनी आज ३ कोटी १ लाखाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. यात महापालिकेचे २७८ कोटी ७२ लाखाचे वार्षिक उत्पन्न आणि अनुदान आहे, तर २७५ कोटी ७१ लाखाचा खर्च आहे. महापालिकेचा सर्वाधिक खर्च अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत असल्याचे अंदाजपत्रकातून समोर आले आहे. महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून महिन्याला ३ कोटीचे उत्पन्न दाखविण्यात आले आहे. त्याच प्रमाणात खर्चही आहे. शहरालगतच्या १८ गावांचा समावेश महापालिकेत होणार असल्याचे लक्षात घेऊन १५ लाख रुपये खर्च करून शहर बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. यावर्षी महापालिकेने नवीन वाहन खरेदीसाठी २४ लाख, पथदिवे व इतर साहित्य खरेदीसाठी १ कोटी, नावीन्यपूर्ण दिवाबत्ती व पोल शिफ्टिंगसाठी १ कोटी २५ लाख, कचरा संकलन २.५० कोटी, सफाई ट्रॅक्टर खरेदीसाठी ५ कोटी, घनकचरा व्यवस्थापन १ कोटी ५० लाख, रुग्णवाहिका खरेदीसाठी २० लाख, शहर सौंदर्यीकरणासाठी १ कोटी ५० लाख, जत्रा व उत्सवांसाठी १० लाख, सार्वजनिक शिक्षण सुविधांसाठी २० लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे. मोक्षधामावर गरिबांच्या अंत्यविधीसाठी २५ लाखाचे जळावू लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाली बांधकामासाठी ३ कोटी, शहरातील अंतर्गत रस्ते व दुरुस्तीसाठी ३ कोटी, तसेच नाटय़गृह दुरुस्तीसाठी ३५ लाख व विविध योजनेंतर्गत मनपा विकासासाठी एक कोटीची तरतूद केल्याची माहिती सभापती नागरकर यांनी दिली.
नागरिकांच्या मालमत्ता करात १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. यासोबतच पाणी कर ४० टक्क्याने वाढविण्यात आलेला आहे. पाणी कर वाढवू नये, अशी सूचना भाजपचे नगरसेवक बलराम डोडानी यांनी केली, तर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका अंजली घोटेकर यांनी पाणी कर वाढवाच, अशी भूमिका बैठकीत घेतल्यामुळे लोकांना मार्चपासून पाणी कराचा भरुदड सहन करावा लागणार आहे. खासगी हॉटेल्स, लॉन, भोजनालय, बार अ‍ॅन्ड रेस्टारंट, मंगल कार्यालये, कम्युनिटी हॉल, हॉस्पिटल, तसेच ८९ व्यवसायांवर सेवाकर लावण्यात आला असल्याची माहिती नागरकर यांनी दिली. सुजल निर्मल योजना पाणी अंकेक्षण करिता मनपा हिस्सा २०१२-१३ मध्ये २५ लाख व २०१३-१४ मध्ये ७५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. नावीन्यपूर्ण योजनेकरिता शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान ६२.५० लाख व मनपा हिस्सा ६२.५० लाख, असे एकूण १ कोटी २५ लाखाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली. शहरात पटेल हायस्कुल, सरई मार्केट, हनफी कॉम्प्लेक्स व पूर्ती बाजारात वाहनतळ सूचविण्यात आले आहेत. महापालिकेला शासनाच्या विविध योजनातून ८.६५ कोटीचा निधी मिळणार आहे. या निधीतूनही विकास कामे घेतली जाणार असली तरी भूमिगत गटार योजनेचे काम नेमके कधी पूर्ण होईल, याचे उत्तर सभापतींना  देता आले नाही. यासोबतच शहरातील रस्त्यांचे कामाला नेमकी कधी सुरुवात होणार, याचेही उत्तर त्यांच्याकडे नव्हते. महापालिका नागरी सेवा उपलब्ध नसल्याबद्दल विचारले असता  याला पूर्वीचे पदाधिकारी जबाबदार असल्याचे उत्तर त्यांनी दिले.