जिल्ह्य़ाच्या दररोजच्या दूधसंकलनात तब्बल ३ लाख ५० हजार लीटर घट झाली आहे. तब्बल ४०१ छावण्यांमधील अडीच लाखांपेक्षा जास्त जनावरांना पुरेसा चारा व पौष्टिक खाद्य मिळत नसल्यामुळे ही घट झाली आहे. अनुदानात वाढ करूनही जनावरांना देण्यात येणा-या रोजच्या चा-यात व पशुखाद्यात काहीच फरक पडला नसल्याची टीका केली जात आहे.
मार्च २०१२ मध्ये जिल्ह्य़ाचे दूध संकलन प्रतिदिन २३ लाख ५७ हजार लीटर होते. ते मार्च २०१३ मध्ये २० लाख १४ हजार लीटर झाले आहे. नगर, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदे, जामखेड, नेवासे या जिल्ह्य़ाच्या दक्षिणेतील तालुक्यांमध्ये छावण्यांची संख्या सर्वाधिक असून प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान ४० हजार लीटरच्या पुढे दूध संकलनात घट झाली आहे. उत्तरेतील तालुक्यांमधील दूधसंकलनही घटले असले तरी ते लक्षणीय नाही. छावण्यांमधून जनावरांना पौष्टिक खाद्य तर नाहीच, पण पुरेसे खाद्य मिळत नसल्यानेच ही घट होत आहे. छावणीचा खर्च सरकारचा असला तरी मेहेरबानी छावणीचालकाची असल्याने चारा किंवा खाद्य कमी मिळत असल्याबाबत कोणीही उघडपणे बोलत नाही. सरकारी अधिका-यांकडून होणारी छावण्यांची तपासणीही यथातथाच असल्याने त्याचाही काही उपयोग व्हायला तयार नाही.
छावण्यांमधून दुभत्या जनावरांना पौष्टिक खाद्य मिळत नसल्यामुळे दूधसंकलन घटले असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी छावणीचालकांना प्रति जनावरामागे अनुदान वाढवून देण्यात आले, त्यानंतरही जनावरांना देण्यात येणा-या खाण्यात काही फरक पडलेला नाही असे ज्यांची जनावरे छावण्यांमध्ये आहेत त्यांचे म्हणणे आहे. खनिजमिश्रित खाद्य तसेच पशुखाद्य देण्यात कुचराई केली जाते तर उसाचे कडक वाढे चारा म्हणून देण्यावर भर दिला जातो, त्यातून जनावरांचे दूध कमी होत चालले असल्याचे सांगण्यात येते.
दुष्काळामुळे बहुतेक शेतक-यांच्या शेतात आता काहीच नाही. त्यातील अनेकांची कुटुंबे दूधधंद्यावरच तगली आहेत. छावण्यांमुळे त्यांना जनावरे जगवण्यासाठी आधार मिळाला, मात्र त्यापासून मिळणा-या दुधात घट झाल्यामुळे उत्पनावरही परिणाम झाला आहे. छावण्यांमध्ये जनावरांना रोज १५ किलो हिरवा चारा, दिवसाआड १ किलो पशुखाद्य, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रित खाद्य देणे छावणीचालकाला बंधनकारक आहे. त्या बदल्यात त्याला सरकारकडून प्रति जनावर रोज ६० रुपये अनुदान मिळत होते. त्यात आता १५ रुपये वाढ करून ते ७५ रुपये करण्यात आले. पशुखाद्य तसेच खनिजमिश्रित खाद्य जनावरांना नियमित व वेळेवर मिळावे असाच उद्देश त्यामागे असावा, मात्र पूर्वीचे अनुदान परवडत नसल्यामुळे ही वाढ मिळाली असल्याचे समजून छावणीचालकांनी जनावरांच्या खाद्यात काहीही फरक केलेला नाही व त्याचा परिणाम दूध मिळण्यावर होत आहे.
एरवी दुभत्या जनावराला किमान २२ ते २५ किलो हिरवी वैरण, ४ ते ५ किलो कोरडी वैरण (कडबा), साधारण दीड किलो पशुखाद्य (मक्याचा भरडा, पेंड वगेरे) व ५० ग्रॅम खनिजमिश्रित खाद्य दररोज दिले जाते. छावण्यांमधून इतके नाही तरीही त्याच्या जवळपास तरी मिळावे अशी जनावरांच्या मालकांची अपेक्षा आहे, मात्र छावणीचालक काही ती पूर्ण करायला तयार नाहीत. सेवाभावी वृत्तीतून ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवल्या जाणा-या छावण्यांची संख्या फार थोडी असून बहुतेक छावण्या या फायदा काय होतो आहे व तो कसा वाढेल या दृष्टिकोनातून चालवल्या जात असल्याचे छावणीतील जनावरांच्या मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दूधसंकलनातील घट दुर्लक्षित केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा