राज्य शासनाच्या मोफत पाठय़पुस्तके योजनेंतून कराड तालुक्यातील मराठी शाळांच्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार आहे. अभ्यासक्रम बदलल्यामुळे पहिली व दुसरीची पुस्तके उशिरा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतची पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक मिळणार आहेत.
शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी ही पुस्तके मुलांच्या हातात पडावीत यासाठी मे महिन्यातच बालभारतीकडून सर्व पुस्तके मागवून ती शाळांकडे पोचविण्याचे काम केले जात आहे. कराड तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत लाभार्थी विद्यार्थीसंख्या पुढील प्रमाणे – पहिली – ७ हजार २८०, दुसरी ५ हजार २२५, तिसरी ६ हजार ९०४, चौथी ७ हजार ६१६, पाचवी ८ हजार १३४, सातवी ८ हजार ४१७, आठवी ८ हजार ६०. सध्या इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतची सुमारे ३ लाख ४१ हजार १४५ पाठय़पुस्तके तालुक्यात उपलब्ध झाली आहेत. दि. १५ जूनला शाळा सुरू होणार असून, या दिवशी विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी शाळांमध्ये दि. ३१ मे पर्यंत पुस्तके पोहोच करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषद शाळांचे २४ केंद्रप्रमुख व कराड नगरपालिकांकडे ३ लाख ४१ हजार १४५ पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. आता केंद्रप्रमुखांकडून शाळांना पुस्तके वाटप करण्यात येत आहेत. कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षणधिकारी डी. एम. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी आनंद पळसे, व्ही. एम. गायकवाड, संपतराव देसाई, नितीन जगताप, केंद्रप्रमुख गजानन वाघ, आनंदराव शेळके, सुभाष कुंभार, अनिल वाघमारे, सुहास जाधव, नित्यानंद फल्ले, विक्रम संकपाळ हे पाठय़पुस्तकांचे शाळांकडे वाटप करण्याचे काम करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा