एकूण मतदार ७० लाख ६१ हजार ३६८
२३ टक्के मतदारांची यादीत छायाचित्रे नाहीत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार याद्या पुनरीक्षण मोहिमेत ३१ जानेवारी २०१४ रोजी ठाणे जिल्ह्य़ात एकूण ७० लाख ६१ हजार ३५८ मतदार असून २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील यादीशी तुलना करता ३ लाख ५८ हजार ९१५ मतदार वाढले आहेत. त्यावेळी जिल्ह्य़ात ६७ लाख दोन हजार ४५३ मतदार होते. आता मतदान करण्यासाठी यादीत छायाचित्र असणे अनिर्वाय असूनही ठाणे जिल्ह्य़ातील तब्बल २३ टक्के मतदारांची यादीत छायाचित्रे नाहीत. त्यांनी त्वरित जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात येऊन छायाचित्रे द्यावीत, असे आवाहन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उप जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील मतदार संख्येचा तपशील जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे.
जिल्ह्य़ातील मतदार याद्यांमध्ये छायाचित्रांचे प्रमाण ७२. ९६ टक्के आहे तर ७५. ४८ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे नसण्याचे प्रमाण जास्त आहे. ३८ लाख ५१ हजार ४८५ पुरुष तर ३२ लाख ९ हजार ८१६ स्त्री मतदार आहेत. सैनिक मतदारांची संख्या एक हजार ५२३ आहे.
६३ हजार नव मतदार
१६ सप्टेंबर २०१३ रोजी यादीत १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ४४ हजार ५४३ इतकी होती. पुनरीक्षण मोहिमेनंतर ६ जानेवारी २०१४ रोजी या वयोगटातील मतदारांची संख्या ६३ हजार ७७२ इतकी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त हे मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावू शकतील.
तृतीयपंथीयांचा निरुत्साह
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्य़ात ७९९ तृतीयपंथी नागरिक आहेत. मात्र त्यापैकी अवघ्या ३६ जणांनी मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे.
ठाणे जिल्ह्य़ाच्या मतदारसंख्येत साडेतीन लाखांची भर
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार याद्या पुनरीक्षण मोहिमेत ३१ जानेवारी २०१४ रोजी ठाणे जिल्ह्य़ात एकूण ७० लाख ६१ हजार ३५८ मतदार असून २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील यादीशी तुलना करता ३ लाख ५८ हजार ९१५ मतदार वाढले आहेत.
First published on: 12-02-2014 at 07:27 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 5 lakhs voters increase in thane