शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत मोने यांच्या कोर्ट गल्लीतील घरात लूटमार करण्यासाठी घुसून त्यांच्यावर चॉपरने वार करणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांनी आज सकाळी पुण्यात अटक केली. यातील अटक केलेल्या एकाने पूर्वी मोने यांच्या घरात फर्निचरचे काम केले होते, त्याचवेळी घरात केवळ महिला असतात, हे पाहून लूटमार करण्याचा कट रचला गेला, असे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले.
समीर ऊर्फ सोनू मुश्ताक कुरेशी (वय २१, रा. सबजेल चौक, नगर), सिराज कलिमोद्दीन काझी (३० रा. जुना मंगळवार बाजार) व संतोष भानुदास शिंदे (२१, रा. खडकी, नगर) अशी तिघांची नावे आहेत. यातील सिराज याने महिन्यापूर्वी मोने यांच्या घरी फर्निचरचे काम केले होते, तर समीर याच्याविरुद्ध पिस्तूल बाळगणे, फसवणूक करणे आदी गुन्हे कोतवाली पोलिसांकडे दाखल आहेत. संतोष हा हमाली काम करणारा आहे. पैशाच्या उद्देशाने तो लूटमारीत सहभागी झाला.
हे तिघे गेल्या सोमवारी (दि. ७) मोने यांच्या घरात घुसले. त्यातील एकाने मुस्लिम महिलेसारखा बुरखा घातला होता. लूटमार करण्यासाठी त्यांनी खेळण्यातील बनावट पिस्तलचाही वापर केला, मात्र मोने यांनी आरडाओरडा केल्याने तसेच डॉ. मोने यांनी प्रतिकार केल्याने तिघांना बुरखा, बनावट पिस्तूल, चॉपर व मोटारसायकल तेथेच टाकून पळ काढावा लागला. या तिघांनी या घटनेपूर्वी काही दिवस आधी जवळच्याच सांगळे गल्लीत एका महिलेकडील सोन्याचे दागिने शस्त्रांचा धाक दाखवून पळवल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस उपअधीक्षक श्याम घुगे व पोलीस निरीक्षक बी. जी. हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोने, हवालदार सुनील चव्हाण, हेमंत खंडागळे, संदीप घोडके, चांगदेव आंधळे यांच्या पथकाने तिघांना पुण्यात पकडले.

Story img Loader