रविवारी टाऊन हॉल बागेजवळ घडलेल्या अमर वसंत म्हाकवेकर या २७ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी त्याच्या आईसह तिघा आरोपींना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अमर तानाजी लोखंडे (वय २२, रा. साळुंखे पार्क, राजारामपुरी), आई सुशीला म्हाकवेकर व रौनकबी कलंदर मुजावर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरात सीरियल किलर खूनप्रकरणामुळे दशहत पसरली होती. खून कोणी केले हे समजत नसताना टाऊन हॉल बागेजवळील खुनाचे धागेदोरे उलगडण्यास पोलीस यंत्रणेला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा पोलीसप्रमुख विजयसिंह जाधव म्हणाले, मृत अमर म्हाकवेकर हा मद्य प्राशन करून घरात आईला त्रास देऊन गैरप्रकाराची मागणी करत होता. त्याच्या या दररोजच्या त्रासाला त्याची आई सुशीला ही कंटाळली होती. या घाणेरडय़ा विकृतीमुळे वैतागलेल्या आईने शेजारच्या बाईची मदत घेऊन अमर लोखंडे याच्याबरोबर संपर्क साधला. मुलगा अमर याला संपवण्यासाठी लोखंडेला २० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली. त्यानंतर लोखंडे याने अमरला घरातून बाहेर नेऊन भरपूर मद्य प्राशन करावयास भाग पाडले. तो मद्याच्या पूर्ण आहारी गेल्याची जाणीव होताच लोखंडे याने त्याच्याजवळील असलेल्या हातरुमालने अमरचा गळा दाबून खून केला.
जाधव म्हणाले, की ही खुनाची घटना बहुचर्चित साखळी खुनाच्या घटनेशी संबंधित नाही. कोल्हापुरात दहा खून झालेले नाहीत. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ अनोळखी व्यक्तींचे खून झालेले आहेत आणि बाकीचे सहा मृत्यू हे या परिसरातील भिकाऱ्यांचे विविध आजारांनी झाले आहेत व याबाबत तपास सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा