इचलकरंजी  येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील मक्तेदारांच्या थकीत बिलांचे धनादेश आठवडाभरात न मिळाल्यास अब्राहम आवळे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला.यानंतर पालिकेत सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या बठकीत मक्तेदारांना आठवडाभरात सुमारे ६० लाख रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागाकडे विविध प्रकारची कामे मोहन घोडके, मुरग्याप्पा पाटील, मौला बागवान, बी. एम. हल्याळ, लक्ष्मण खिलारे व प्रेसिजीन इंजिनिअरींग हे मक्तेदार करतात. या सर्वाची मिळून सुमारे 3 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. या थकीत बिलापोटी धनादेश न मिळाल्यास काम न करण्याचा इशारा सदर मक्तेदारांनी दिल्याने पाणीपुरवठा खात्याकडील सर्वप्रकारची कामे ठप्प झाली आहेत.
लिगाडे मळा, जामदार मळा, योगायोगनगर आदी परिसरातील नळांना पाणी अपुरे व कमी दाबाचे मिळत असल्याने नगरसेविका सारिका धुत्रे, महादेव गौड, रुपाली दत्तवाडे, मोहन कुंभार व सुनीता भुते यांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या. त्याबाबत अधिक चौकशी करता मक्तेदारांची बिले थकल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले असल्याचे नगरसेवकांना कळून आले. यावरुन चारही नगरसेवकांनी पाणीपुरवठा सभापती आवळे यांना त्याचा जाब विचारला. आवळे यांनीही अगतिक असल्याचे सांगितले. या सर्वानी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्याकडे तक्रार केली असता संयुक्त बठक घेण्याचे ठरले. बठकीत नगराध्यक्षा  गोंदकर, उपनगराध्यक्ष कलागते, राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक जांभळे आणि विरोधी शहर विकास आघाडीचे पाच नगरसेवक उपस्थित होते. या वेळी सभापती आवळे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. मात्र पुढील आठवडय़ात मक्तेदारांचे धनादेश देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा