स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या २८ मे रोजी येत असलेल्या जयंतीनिमित्त दादरच्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात रविवार २६ मेपासून तीन दिवसांचा कार्यक्रम असून त्यात भारत-चीन युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सेनानींसोबतची चर्चा हे विशेष आकर्षण आहे.
रविवार २६ मे रोजी सकाळी ११ वाजता नितीन शास्त्री यांनी संकलित केलेल्या भारत-चीन युद्धातील दुर्मीळ अशा २५० छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे महापौर सुनील प्रभू यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन २८ मेपर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री १० यावेळेत खुले राहील. याच दिवशी, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता अर्थतज्ज्ञ गिरीश जखोटिया यांचे ‘स्वा. सावरकर आणि २१ व्या शतकातील दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता ‘स्वातंत्र्य रवी’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होईल. वर्षां भावे, सागर सावरकर, चैतन्य कुलकर्णी आणि शैलजा सुब्रमण्यम ही गीते गातील तर द्वारकानाथ संझगिरी आणि मंजिरी मराठे यांचे निवेदन असेल. मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात १९६२ च्या भारत-चीन युद्धात सहभागी झालेले डेफ्ट. कर्नल (निवृत्त) केशव पुणतांबेकर आणि ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांच्याशी द्वारकानाथ संझगिरी आणि नितीन शास्त्री हे चर्चा करतील. याचवेळी संरक्षणसंशोधक डॉ. अमोल गोखले यांना विज्ञान पुरस्काराने, २०१२ च्या शौर्य चक्रने सन्मानित डेफ्ट. मनिष सिंग यांना शौर्य पुरस्काराने, विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित झालेले लष्करी रुग्णालयातील डॉ. (डेफ्ट. कर्नल) एसपी ज्योती यांना समाजसेवा पुरस्काराने गौरविले जाईल. समाजसेवक रमेश डांगे, चंद्रकांत शहासने आणि गायक सतिश भिडे यांना सावरकर स्मृतीचिन्ह देऊन गौरविले जाईल. हे सर्व कार्यक्रम दादर शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात होतील आणि जनतेसाठी खुले असतील.

Story img Loader