टायर फुटल्याने रस्त्यावर थांबलेल्या ऊसवाहतुकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून मोटारसायकल धडकल्याने घडलेल्या अपघातात मोटारसायकलवरील तिघेजण जागीच मरण पावले. अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावर अकलूजजवळ लवंग गावच्या शिवारात रात्री हा अपघात झाला. या प्रकरणी अकलूज पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
दीपक शिवाजी पवार (वय ३०, रा. नातेपुते, ता. माळशिरस) या मोटारसायकलस्वारासह त्याच्या सोबतचे रोहित दशरथ गोरे (वय १८, रा. एकतपूर, ता. सांगोला) व बाबुराव अंगद आरेकर (वय १८, रा. भूम, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेजण एमएच १२ बीके-९७१३ या मोटारसायकलवरून रात्री उशिरा प्रवास करीत होते. तर एमएच ४५ एफ-६८११ हा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांसह ऊस घेऊन सांगवी येथून श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. परंतु वाटेत लवंगजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर अचानकपणे फुटले. त्यामुळे ट्रॅक्टर पुढे न जाता रस्त्यावर थांबला होता. मात्र रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर व ट्रॉली न दिसल्याने पाठीमागून मोटारसायकलस्वार ट्रॅक्टरवर धडकले. यात तिघेजण जागीच मृत्युमुखी पडले.
या अपघातात दोन्ही वाहनचालकांचा दोष आढळून आल्याने मृत मोटारसायकलस्वार दीपक पवार याच्यासह ट्रॅक्टरचालक तानाजी नागनाथ ननवरे (रा. फूटजवळगाव, ता. माढा) या दोघांविरुध्द अकलूज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस. एम. इंगोले यांनी फिर्याद दाखल केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा