गोदावरी कालव्याचा पाणीप्रश्नावर माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नाशिक-शिर्डी-कोपरगाव रस्त्यावरील झगडेफाटा येथे सोमवारी सकाळी दहा ते एक असे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी प्रमुखांसह ७०० ते ८०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
एकीकडे शेतीला पाणी तर नाहीच, पण पिण्याच्या पाण्याची परिस्थितीदेखील अवघड झाली आहे. दुसरीकडे विद्युत रोहित्र बंद करण्याचे काम सुरू आहे. अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी भरडला जात असतानाही इंडिया बुल्स आणि जायकवाडीच्या पाण्याचे भूत आमच्या मानगुटीवर बसले असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी या वेळी केले.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे म्हणाले, इंडिया बुल्स प्रकल्पात सर्वच पक्षाचे मोठमोठे राष्ट्रीय पुढारी गुंतले आहेत, त्यांच्या विरोधात कुणीही बोलत नाही. आम्ही बोलतो तर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही. अठरा महिन्यांपूर्वी शासन व इंडिया बुल्स कंपनीबरोबर दोन करार करून त्यांना पाणी दिले गेले त्याविरुद्ध नगर-नाशिक जिल्हय़ातील आमदार विधिमंडळात आवाज उठवायला तयार नाहीत. इंडिया बुल्स प्रकल्पाचा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना समजला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनीचे संचालक विश्वासराव महाले यांनी करून आभार मानले. कार्यकारी अभियंता बाफना यांनी पिकांचे भरणे होत नाही तोपर्यंत कालवे सुरू ठेवू असे आश्वासन दिले.
बाफना यांना धारेवर धरले
शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलनात नाशिक पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता सुनील बाफना यांना चांगलेच धारेवर धरत त्यांच्यासह या खात्याचा केला. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी यात हस्तक्षेप करून हे प्रकरण हातघाईवर येण्यापासून थांबवले. पोलीस निरीक्षक मधुकर औटे यांनी कार्यकारी अभियंता बाफना यांना पोलीस बंदोबस्तात सुरक्षित बाहेर काढले व प्रकरण शांत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा