सोलापूर महापालिकेच्या तुळजापूर रस्त्यावरील कचरा डेपोत खासगी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पात बायोगॅस टाकीचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत दोघा तरुण कामगारांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच कामगार जखमी झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
नूरमोहम्मद सादिक अन्सारी (वय २६) व अबुलहसन महिबूब सय्यद (वय २५, दोघे रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघा कामगारांची नावे आहेत. तर गुलचंद कदेरा गुप्ता (वय १९), भूषण श्रीविजय गुप्ता (वय २१), मोहम्मद इकरार अन्सारी (वय २९, तिघे रा. रामपूर, उत्तर प्रदेश), मोहम्मद मैनोद्दीन नईम (वय २४, रा. झारखंड) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या सर्वाना छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर महापालिकेच्या तुळजापूर रस्त्यावरील कचरा डेपोलगत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा खासगी प्रकल्प उभारण्यात आला आहे. सोलापूर बायोगॅस एनर्जी सिस्टिम प्रा. लि. या कंपनीमार्फत ८ मेगावॉट वीजनिर्मितीचा हा प्रकल्प उभारण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या ठिकाणी अद्याप वीजनिर्मितीला मुहूर्त लागला नाही. प्रकल्पाच्या ठिकाणी बायोगॅसची सुमारे शंभर फूट आकाराच्या सिमेंट काँक्रीटची टाकी उभारण्यात आली असून त्यावर वेल्िंडगचे काम सुरू होते. वेल्डिंग करताना अचानकपणे त्यात स्पार्किंग होऊन जवळच्या बायोगॅसपर्यंत ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणातच बायोगॅस टाकीचा स्फोट झाला. त्यापाठोपाठ टाकीचा स्लॅब खाली कोसळला. यात कामगारांपैकी नूरमोहम्मद अन्सारी याचा जागीच मृत्यू झाला. तर अबुलहसन सय्यद हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार होताना काही वेळातच मरण पावला.
या दुर्घटनेची माहिती समजताच त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेने तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. कोसळलेल्या सिमेंटच्या टाकीच्या स्लॅबच्या ढिगाऱ्यात आणखी काही कामगार गाडले गेल्याची भीती व्यक्त झाल्याने त्यानुसार शोधकार्य करण्यात आले. दरम्यान, महापौर अलका राठोड यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, आयुक्त अजय सावरीकर, पोलीस उपायक्त सुभाष बुरसे आदींनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या स्फोटच्या कारणांचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक पथकाचीही मदत घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा