सोलापूर शहरात काल मंगळवारी रात्री दोन घरफोडय़ा होऊन त्यात सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. शहर व परिसरात घरफोडय़ांचे प्रमाण वाढत चालल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर कायम राहिले आहे.
काल रात्री पहिली घरफोडी दक्षिण सदर बझार भागातील गांधीनगर येथे नारायण भूमय्या चनमल यांच्याकडे झाली. चनमल कुटुंबीय रात्री घरात झोपले असताना चोरटय़ांनी घराच्या दरवाजाची आतून लावण्यात आलेली कडी कशाने तरी काढली आणि आत प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून सोने व चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख ५ हजारांचा ऐवज लांबविला. पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधीनगरात ही घरफोडी झाल्याने तेथील रहिवाशी धास्तावले आहेत. या गुन्हय़ाची नोंद सदर बझार पोलीस ठाण्यात झाली आहे.
पश्चिम मंगळवारपेठेत राहणारे रमेश मल्लिकार्जुन आडके यांची घरफोडी होऊन त्यात सुमारे दोन लाखांचा ऐवज लांबविण्यात आला. आडके कुटुंबीय गेले आठ दिवस घर बंद करून परगावी गेले होते. त्याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी ही घरफोडी केली. यात रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने चोरीला गेला. मंगळवारी सकाळी आडके कुटुंबीय परत आले तेव्हा या घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली असून, पोलिसांनी गुन्हय़ाचा शोध घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाची मदत घेतली आहे.