निळवंडे धरणाचे पाणी २०१४ पूर्वी कालव्याद्वारे जिरायत भागाला मिळाले नाही, तर आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जनता या सर्व लोकप्रतिनिधींचा हिशोब केल्याशिवाय रहाणार नाही. निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी निधी आणण्यास असमर्थ असाल, तर जिल्ह्यातील मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते व विरोध पक्षाच्या दोन्ही खासदारांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन आपली नैतिकता दाखवावी असे आवाहन आंदोलकांनी केले.
निळवंडे धरणाच्या कामासाठी भरीव तरतूद करण्याच्या मागणीसाठी निळवंडे धरण पाटपाणी कृती समितीच्या वतीने आज हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नगर-मनमाड राज्यमार्गावर िपप्रीनिर्मळ येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याच पक्षाकडे अर्थ आणि जलसंपदा खाते आहे. पिचड मात्र निळवंडय़ाच्या कालव्यांना निधी मिळवून देण्याऐवजी कालवे वरुन की खालून असा वाद उपस्थित करुन, या कामात खो घालत आहेत असा आरोप निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी केला. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे तसेच पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडूनही निळवंडेच्या कामासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचा आरोप शेळके यांनी केला.
गंगाधर गमे, रूपेश काळे, पुष्पा घोरपडे, राधू राऊत, नानासाहेब जेवरे, चौधरी महाराज, नकुल वाघे, प्रशांत दंडवते, सुखदेव घोरपडे, विठ्ठलराव शेळके, भास्कर काळे, भिमराज कुदळे आदींची भाषणे झाली. नायब तहसिलदार राहुल कोताळे व निळवंडे कालव्याचे अभियंता एम. टी. मोरे यांना निवेदन आंदोलन संपवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी बैलगाडय़ांसह रस्त्यावर ठाण मांडले होते. त्यामुळे ऐन उन्हात दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा लागल्याने प्रवशांचे हाल झाले.

Story img Loader