नवरात्र उत्सवाला दहा दिवसांचा अवधी उरलेला असताना शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळात धामधूम सुरू झाली आहे. शहरातील चितारओळसह विविध भागातील मूर्तीकार दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. एकीकडे महागाईने आधीच जनता त्रस्त झालेली असताना यावर्षी दुर्गादेवीच्या मूर्तींच्या किमतीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.
एकीकडे चितारओळीत देवीच्या मूर्ती घडविल्या जात असताना दुसरीकडे शहरातील विविध भागातील सार्वजानिक दुर्गादेवी मंडळात वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. चितारओळ आणि कुंभारपुरा भागात फेरफटका मारला असता अनेक मूर्तीकार दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त दिसले. चितारओळीतील प्रमोद सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, साधारणत: विघ्नहर्त्यां गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्रारंभ करीत असतो. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुर्गादेवीच्या मूर्तीचे भाव ३० टक्कयांनी वाढले आहे. देवीची मूती तयार करण्यासाठी लागणारी माती, सुतळी, लाकूड, आभूषणे, रंग, तणस आदी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी १५०० रुपयांपासून १५ हजार रुपयापयर्ंत दुर्गादेवीच्या मूर्ती विक्रीला आहेत. गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जेवढी मेहनत लागत नाही त्यांच्या दुपटीने मेहनत व वेळ दुर्गा देवीची मूर्ती घडविण्यासाठी लागतो. दुर्गादेवीला आभूषणे बरीच चढविली जातात. मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विदर्भात सावनेर, खापरखेडा, उमरेड, भंडारा, यवतमाळ या ठिकाणाहून मूर्तीची मागणी आहे. शहरात अनेक ठिकाणी दुर्गा उत्सव साजरा केला जातो. दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जागा बरीच लागत असल्यामुळे जेवढी मागणी तेवढय़ाच मूर्ती तयार केल्या जातात.
शहरातील विविध भागात नवरात्र उत्सवाची तयारी जोमात सुरू झाली आहे. विविध भागात विविध आकर्षक मंदिरे उभारण्याचे काम सुरू झाले असून स्थानिक कारागिराशिवाय कोलकाताचे कारागीर रात्रंदिवस काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवात जसे वातावरण असते तसेच देवीच्या नवरात्र उत्सवात दिसून येते. उज्व्जल नगर, अभ्यंकर नगर, खामला, सदर, पाचपावली, सीताबर्डी, हनुमाननगर, रेशीमबाग, गोकुळपेठ, रामनगर आदी शहरातील विविध भागात मोठ मोठय़ा मंदिराच्या प्रतिकृती तयार करीत असल्यामुळे ते पाहण्यासाठी भाविकांची गर्दीही मोठय़ा प्रमाणात होत असते. मंदिराच्या प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी काही मंडळात कोलकाता आणि गुजराथचे कलाकार आले आहेत.
खामलामध्ये सिंध माता मंडळातर्फे प्रकाश तोतवानी यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्रा, उज्वलनगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे दिल्लीचा लाल किल्ला. लक्ष्मीनगरमध्ये संदीप जोशी यांच्या नेतृत्वात स्वामी विवेकानंदाच्या १५० व्या जन्मशताब्दीनिमित्त विवेकानंद स्मारक, अभ्यंकरनगरमध्ये विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जयपूरचे मंदिर, अशोकनगरमध्ये तिरुपती मंदिराची प्रतिकृती तयार केली जात आहे.
शहरातील विविध देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून मंदिराला रंगरंगोटी करण्यात येत आहे. आग्याराम देवी, कोराडी, पारडीतील भवनीदेवी, प्रतापनगर दुर्गा मंदिर, सेंट्रल अॅव्हेन्यूवरील रेणुका मंदिरात तयारी सुरू झाली आहे. कोराडी आणि आग्याराम देवीच्या मंदिरात भाविकांची संख्या पाहता प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शिवाय शहरातील विविध भागात गरबा उत्सव आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दुर्गोत्सवालाही महागाईची झळ; मूर्तीच्या किमतीत ३० टक्के वाढ
नवरात्र उत्सवाला दहा दिवसांचा अवधी उरलेला असताना शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळात धामधूम सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-09-2013 at 07:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 price increase on durga idols