पनवेल शहरातून गेल्या ४५ दिवसांमध्ये ३० दुचाकी व इतर वाहने चोरीस गेली आहेत. पनवेल शहराचे संरक्षण करण्यासाठी १८० पोलीस तैनात आहेत. तरीही शहरात दररोज वाहनचोरीचे सत्र सुरूच असल्याने शहरात हुकुमत पोलिसांची की चोरांची दहशत, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. गस्त वाढविल्याचे पोलिसांच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र तरीही वाहनचोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या सर्व प्रकारामुळे पनवेलचा वाहन मालकवर्ग धास्तावला आहे.
शहरातून गेल्या डिसेंबर ते जानेवारी महिन्यातील ४५ दिवसांमध्ये ३० वाहने चोरीस गेल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाहनचोरीची तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या तक्रारदारांना दोन दिवस वाहने शोधण्याची शिक्षा पोलिसांच्या वतीने पीडित वाहन मालकाला देण्यात येते. दोन दिवसांत वाहन सापडले नाही तर पुन्हा वाहन मालक पोलिसांकडे आल्यानंतर चोरीची फिर्याद नोंदविण्याचा प्रकार सुरू होतो. वाहन मालकांकडे कागदपत्र उपलब्ध नसल्यास पोलीस स्टेशन डायरीमधील गुन्ह्य़ांचा चढता आलेख वाढू नये यासाठी तक्रार दाखल न करताच वाहन मालकांची बोळवण केली जाते.  
त्यामुळे पनवेलकर नागरिक आपली वाहने पोलिसांच्या जिवावर सोडून न देता साखळी-दोरखंडाने बांधून ठेवू लागले आहेत.  वाहनचोरांच्या वाढत्या दहशतीमुळे रस्त्यावर रात्री पार्क करून ठेवलेल्या वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. मात्र अनेक सोसायटय़ांमध्ये पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने नाइलाजाने तेथील रहिवाशांना आपली वाहने रस्त्यावर ठेवावी लागतात.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी झालेल्या वाहनचोरींपैकी २१ टक्के गुन्ह्य़ांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शहरात अनेकदा मुले इमारतीखाली बेकायदा उभी केलेली दुचाकी घेऊन शहरभर फिरतात आणि पेट्रोल संपल्यानंतर अज्ञातस्थळी ठेवतात. त्यासाठी वाहन मालकांनीही रेल्वे स्थानकातील पार्किंग झोनमध्येच आपली वाहने उभी करणे गरजेचे आहे. ४५ दिवसांत ३० वाहनांची चोरी ही आकडेवारी केवळ पनवेल शहराची नसून संपूर्ण तालुक्याची असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा