यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जायकवाडीच्या जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधून अतिरिक्त पाणी मिळावे, या साठी मराठवाडय़ातील नेत्यांनी बराच संघर्ष केला. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा पाणी सोडण्याचे आदेश दिले. पहिल्या वेळी अडीच व दुसऱ्या वेळी ९ टीएमसी पाणी जायकवाडी जलाशयात सोडण्यात आले. त्यातील बहुतांश पाणी जिरले. जेवढे पाणी जलाशयात आहे, त्याचा योग्य उपयोग केला, तर जुलैअखेर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. पण परिस्थिती अशी आहे की, महापालिकेच्या जलवाहिनीला ३००पेक्षा अधिक ठिकाणी गळती आहे. पाणी गळतीचा आढावा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी घेतला. २४ तासांत गळती बंद करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहरात अनधिकृत नळधारकांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे सोमवारी आयोजित बैठकीत ठरविण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गळती थांबविण्याच्या कामात हलगर्जीपणा करीत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. कामात सुधारणा नाही झाली तर कडक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले. शहरात विविध ठिकाणी पाण्याचा गैरवापर होतो. गाडय़ा धुण्यासाठी, तसेच घर धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जाते. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात पालिकेने दंडाची रक्कम पूर्वीच ठरवून दिली होती. गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करता यावी, या साठी पथकही स्थापन केले होते. काही दिवस पथकाने काम केले आणि नंतर ही मोहीम थंडावली. यापुढे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांविरोधात कडक कारवाई करावी, असेही बैठकीत ठरले.
पाणीपुरवठा विभागात वेगवेगळ्या प्रकारचे ठेके मिळविणाऱ्या कंत्राटदारांची देयके गेल्या अनेक दिवसांपासून थकली आहेत. ठेकेदारांची एकचतुर्थाश रक्कम तसेच २ लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण देयक अदा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ३०० ठिकाणी पाणी गळती असल्याने महापालिकेच्या कारभारावर टीका होत आहे. पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महापालिकेच्या कारभारावर टीका केली होती. पाणीपुरवठय़ात ३०० ठिकाणी गळती असल्याचे सोमवारी मान्य करण्यात आले. ही गळती तातडीने बंद करण्याचे आदेश निघाले आहेत.   

Story img Loader