मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ात कुपोषणाने कहर केला आहे. जिल्ह्य़ातील जळगाव जामोद, संग्रामपूर या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यांसह तेराही तालुक्याला वाढत्या कुपोषणाने चांगलाच विळखा घातला आहे. जिल्ह्य़ात सुमारे ३ हजाराहून अधिक बालके अती कमी वजनाच्या कुपोषणाच्या श्रेणीत असल्याची खळबळजनक माहिती आहे. कुपोषण निर्मूलन व मुक्तीसाठी शासन कोटय़वधी रुपये खर्च करीत असतांना त्यासाठी आलबेल असल्याचे दावे मात्र फोल ठरत आहेत.
जिल्ह्य़ातील तेराही तालुक्यात या कुपोषणाने पाय पसरले असून ३ हजार बालके कुपोषणाच्या विळख्यात आहेत. त्यापैकी १ हजाराहून अधिक बालके धोक्याच्या श्रेणीत म्हणजे, मृत्यूच्या दाढेत असून जगण्याचा पराकोटीचा संघर्ष करीत आहे. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुडय़ाच्या कुशीत अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे आहेत. या तालुक्यात कुपोषणाचा जोर अधिक आहे. जळगाव जामोद तालुक्यात ५४५, तर संग्रामपूर तालुक्यात १५२ अती कमी वजनाची बालके कुपोषणाच्या विळख्यात असल्याचा शासकीय आकडा असला तरी तो फसवा असून त्यापेक्षा परिस्थिती कितीतरी गंभीर आहे. चिखली तालुक्यातील किन्हीनाईक, धोत्रानाईक, खामगाव तालुक्यातील अंबेटाकळी, मेहकर तालुक्यातील घाटबोरी परिसर, मोताळा तालुक्यातील कुऱ्हा गोतमारा परिसर, अशा आदिवासी दुर्गम परिसरातही कुपोषणाने थमान घातले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार खामगाव तालुक्यात १६५, शेगाव तालुक्यात २३५, चिखली तालुक्यात ३३६, बुलढाणा तालुक्यात २५२, मोताळा तालुक्यात १२१, लोणार तालुक्यात १८१, मेहकर तालुक्यात १३०, सिंदखेडराजा तालुक्यात ३६०, देऊळगावराजा तालुक्यात १०० बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. यापेक्षाही हा आकडा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्य़ातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे जिल्ह्य़ातील कुपोषणाचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण होत नसल्याचे दिसून आले आहे. हे सर्वेक्षण व उपाययोजना या अंगणवाडय़ांवर सोपवून जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणा निर्धास्त असतात. महिला व बालकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व तालुक्याचे प्रकल्प अधिकारी कुपोषणग्रस्त भागाला नियमित भेटी देत नाहीत.
अंगणवाडय़ांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविण्यात येतो. ठिकठिकाणी आवश्यक जीवनसत्त्वाची औषधे पुरविली जात नाहीत. अंगणवाडय़ांची पटपडताळणीही संशयाच्या फेऱ्यात अडकलेली आहे. पोषण आहाराच्या अव्वाच्या सव्वा खरेदीसाठी या बोगस पटपडताळणीचा वापर करण्यात येतो. या जिल्ह्य़ात कुपोषण निर्मूलनासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्य़ात मेळघाट व नंदुरबारप्रमाणे सातपुडय़ातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात दुर्गम व आदिवासीबहुल भाग आहे. येथे कुपोषण निर्मूलनासाठी पथदर्शी प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवाही कुपोषणाकडे दुर्लक्ष करतात. एकात्मिक बालविकास प्रकल्पाप्रमाणे आरोग्य विभागाची कुपोषण निर्मूलनाबाबत जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. जिल्हास्तरावर कुपोषण निर्मूलनाच्या आढावा व उपाययोजना सभा व बैठका होत नाहीत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण हेही कुपोषणग्रस्त भागांना भेटी देत नाहीत. त्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जिल्ह्य़ात कुपोषण निर्मूलनासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत केवळ जनजागृती व लोकशिक्षणासाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही रक्कम अशी वायफळ खर्च न करता ती प्रत्यक्षात कुपोषण निर्मूलनासाठी खर्च केल्यास त्यातून बरेच साध्य होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया एका सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्त केली.
तीन हजार कुपोषित बालकांचा मृत्यूशी निकराचा लढा
मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ात कुपोषणाने कहर केला आहे. जिल्ह्य़ातील जळगाव जामोद, संग्रामपूर या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यांसह तेराही
First published on: 12-12-2013 at 09:28 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3000 malnutrition suffering children fights to death