शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या भंडारा जिल्ह्य़ात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून आतापर्यंत जिल्ह्य़ात ३०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी एकूण १०४ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. १९१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून ५ प्रकरणे प्रलंबित आहेत.
भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा म्हणून ओळखला जातो. धान उत्पादक शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी इतर कोणत्याही पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बहुतेक येत नाहीत. कधी पाऊस न आल्याने, तर कधी अधिकचा आल्याने हा शेतकरी संकटात सापडतो. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी उत्पन्न चांगले होणे गरजेचे आहे. नापिकी होऊन उत्पन्नात घट झाल्यास नुकसान होते व कर्ज फेडतांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी कर्जबाजारी शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशाच कर्जामुळे खचून गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी जिल्ह्य़ात आत्महत्या केल्या आहेत.
२००३ सालापासून २०१२ पर्यंत ३०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. २००६ व २००७ मध्ये ५०च्या आसपास शेतकऱ्यांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविली. २०११ मध्ये ४६ शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने गेले, तर २०१२ मध्ये १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आतापर्यंत झालेल्या ३०३ आत्महत्यांपैकी जिल्हा समितीने मदतीसाठी १००, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून ४, अशा १०४ जणांची प्रकरणेच पात्र ठरली आहेत. त्यांना १ कोटी ७ लाखांची मदत वाटण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे २००६ व २००७ मधील आहेत. दोन्ही वर्षांत २२-२२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. यावरून या वर्षांत झालेल्या आत्महत्या या खऱ्या अर्थाने शेतकरी आत्महत्या होत्या, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. १९१ प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहे. अपात्र ठरविण्यात आल्याने या शेतकऱ्यांची आत्महत्या ही नापिकी किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून नसून इतर कारणाने झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अजूनही ५ प्रकरणे मदतीच्या प्रतीक्षेत असून ही प्रकरणे प्रलंबित आहे. प्रलंबित असलेली ही प्रकरणे तालुकास्तरावर आहेत.
भंडारा जिल्ह्य़ात ३०३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मदत १०४ जणांनाच
शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या भंडारा जिल्ह्य़ात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून आतापर्यंत जिल्ह्य़ात ३०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी एकूण १०४ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. १९१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून ५ प्रकरणे प्रलंबित आहेत.
First published on: 14-12-2012 at 01:49 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 303 farmers susides in bhandara distrect but help is provided to only