यंदाच्या मोहिमेतील, जिल्हा परिषदेतील अखेरच्या, शिपाईपदाच्या भरतीसाठी उद्या (शनिवारी) लेखी परीक्षा होत आहे. या ९१ जागांसाठी तब्बल ३२ हजार ६४० उमेदवार परीक्षेस दाखल होतील. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ातून या पदासाठी अर्ज तर आले आहेतच, शिवाय लगतच्या कर्नाटक राज्यातूनही काही उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
उमेदवारांच्या मोठय़ा संख्येमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर (प्रशासन) यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चोख नियोजन केले आहे. यंदा प्रथमच नगर शहराबाहेर तालुका ठिकाणीही परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण ३ हजार १०० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर व्यवस्थेसाठी १२७ वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत. त्यामुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत अक्षरश: शुकशुकाट होता. याव्यतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात असेल. परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागप्रमुखांची १६ भरारी पथके तैनात केली जातील. तालुक्यांसाठी स्वतंत्र फिरती पथके आहेत.
लेखी परीक्षेची वेळ दुपारी २ ते ३.३० आहे. नगर शहरात ५५ केंद्रांवर १८ हजार २१६ उमेदवार, कोपरगावमधील १२ केंद्रांवर ७ हजार ८७२, श्रीरामपूरमधील ९ केंद्रांवर २ हजार ४७२ राहुरीतील ६ केंद्रांवर २ हजार १६ व नेवासेमधील ३ केंद्रांवर २ हजार ६४ उमेदवार परीक्षा देतील. उमेदवारांमध्ये अंध, अपंग, क्षीणदृष्टी व स्नायू आजारांचे १ हजार ३३५ उमेदवार आहेत, त्यांच्या परिक्षेची व्यवस्था अहमदनगर कॉलेजमध्ये करण्यात आली आहे. त्यातील ८३७ अपंगांना लेखनिकाची गरज असल्याने तसे साहाय्यही दिले जाणार आहे. त्यासाठी लेखनिकांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
उमेदवारांना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, काही अडचण असल्यास उमेदवारांनी एमकेसीएल (०२४१-६६०२५३३) यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन आहे.
शिपाईपदाच्या भरतीपूर्वी उद्या (शनिवार) सकाळी १० ते ११.३० वेळात स्टेनो व विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदासाठी लेखी परीक्षा होईल. स्टेनोच्या एका पदासाठी १६८ तर विस्तार अधिकारीच्या २ पदांसाठी ६१० उमेदवार आहेत.

Story img Loader