सलग दोन वर्षे दुष्काळाचा सामना कराव्या लागणा-या सोलापूर जिल्हय़ात यंदा वरुणराजाने दाखविलेल्या कृपादृष्टीने चित्र बदलले आहे. एकीकडे पाणीपुरवठय़ासाठी टँकरची संख्या निम्म्याने घटली असताना दुसरीकडे मुक्या जनावरांसाठी कार्यरत असलेल्या चारा छावण्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. मात्र चारा छावण्यांद्वारे तब्बल ३२२ कोटी ८४ लाखांचा खर्च झाल्याचे दिसून येते.
दुष्काळी जिल्हय़ात यंदा पावसाची साथ मिळाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी मंगळवेढा व सांगोल्यात मात्र अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने तेथील दुष्काळाची काळी छाया कायम आहे. जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांत ५२.२४ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत केवळ १५८.५४ मिलिमीटर एवढाच पाऊस पडला होता. यंदाच्या वर्षी आतापर्यंत २१९.९१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २५५.३४ मिमी पाऊस पडला आहे. मात्र मंगळवेढा व सांगोला हे दोन तालुके त्यास अपवाद आहेत. मंगळवेढय़ात आतापर्यंत केवळ १५८.३१ मिमी (३५.३४ टक्के) तर सांगोल्यात फक्त १४९.४४ मिमी (३८.६५ टक्के) इतकाच पाऊस पडला आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता इतरत्र पावसाने चांगली साथ दिल्याचे दिसून येते. यात भर म्हणजे उजनी धरणातही पाण्याचा साठा जवळपास भरत आला आहे. त्यामुळे धरण लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण दिसून येते.
या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात पाण्यासाठी कार्यरत असलेल्या टँकरच्या संख्येत घट झाली असून सध्या जिल्हय़ात मंजूर ३५९ टँकरद्वारे बाधित सहा लाख ४५ हजार लोकसंख्येच्या २९८ गावे व १६१४ वाडय़ांना पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळय़ात तीव्र दुष्काळात पाण्यासाठी तब्बल सातशे टँकर धावत होते. सध्या सांगोल्यात ६६, मंगळवेढय़ात ६२ तर माढय़ात ५० टँकर कार्यरत आहेत. माढा येथे जिल्हय़ात सर्वाधिक ७५ टक्के पाऊस होऊनदेखील तेथे टँकर चालू आहेत. याशिवाय करमाळा-५७, उत्तर सोलापूर-१४, मोहोळ-११, माळशिरस-१०, अक्कलकोट-७, दक्षिण सोलापूर-८, बार्शी-६ याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
सलग दुस-या वर्षी दुष्काळाची झळ बसल्याने मुक्या जनावरांसाठी जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. परंतु आता त्यात लक्षणीय घट होऊन केवळ ९९ चारा छावण्या सुरू आहेत. यात ८४ हजार ३०१ मोठी व ९६८७ लहान अशी एकूण ९३ हजार ९८८ जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जात आहे. सर्वाधिक ७५ चारा छावण्या एकटय़ा सांगोला तालुक्यात तर २१ छावण्या मंगळवेढय़ात आहेत. पंढरपुरात केवळ ३ छावण्या सुरू आहेत. जिल्हय़ात उर्वरित ठिकाणी एकही छावणी सुरू नसल्याचे दिसून येते. जिल्हय़ात चारा छावण्यांची संख्या ३५६ पेक्षा जास्त होती. त्यात आता घट झाली असली तरी एकूण चारा छावण्यांवर आतापर्यंत ३२२ कोटी ८४ लाख २० हजारांचा खर्च झाला आहे. गेल्या मार्च महिन्यापूर्वी झालेला खर्च १४५ कोटी ३५ लाख ५८ हजारांचा होता, तर एप्रिलपासून आजतागायत झालेल्या खर्चाची रक्कम १७७ कोटी ४८ लाख ६० हजार ६६८ रुपयांइतकी आहे. सांगोल्यात चारा छावण्यांवर झालेला एकूण खर्च २०६ कोटी ३० लाख तर मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांचा खर्च ३७ कोटी ५५ लाख ९४ हजार इतका आहे. सर्वाधिक पाऊस व सर्वाधिक उसाची लागवड असलेल्या माढा तालुक्यात ४६ चारा छावण्या सुरू होत्या. त्यावर झालेला खर्च २२ कोटी २० लाख ६२ हजार इतका आहे.
सोलापूरमध्ये चारा छावण्यांत ३२३ कोटींचा चारा फस्त
सलग दोन वर्षे दुष्काळाचा सामना कराव्या लागणा-या सोलापूर जिल्हय़ात यंदा वरुणराजाने दाखविलेल्या कृपादृष्टीने चित्र बदलले आहे. एकीकडे पाणीपुरवठय़ासाठी टँकरची संख्या निम्म्याने घटली असताना दुसरीकडे मुक्या जनावरांसाठी कार्यरत असलेल्या चारा छावण्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे.
First published on: 06-08-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 323 crore spent in fodder camp in solapur