‘महापालिका अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमाला पुणेकरांचा चांगला पाठिंबा मिळत असून सन २०१३-१४ च्या अंदाजपत्रकासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत नागरिकांनी साडेदहा कोटी रुपयांची वाढ करून घेण्यात यश मिळवले आहे. या अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी तीन हजार तीनशे कामे सुचवली आहेत.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात पुणेकरांनी सहभाग घेऊन स्थानिक स्तरावरील विकासकामे सुचवावीत, असा उपक्रम गेली काही वर्षे सुरू आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थाही जनजागृती करत आहेत. या प्रयत्नांना चांगले यश येत आहे. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकासाठी (सन २०१२-१३) नागरिकांनी सहाशे कामे सुचवली होती, तर सन २०१३-१४ च्या अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी सुचवलेल्या कामांची संख्या तीन हजार तीनशे इतकी आहे. नागरिकांनी कामे सुचवण्यासाठी पुढाकार घ्यावा या हेतूने जनवाणी संस्थेने महापालिकेच्या सहकार्याने कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या आयोजनात फेस्कॉम तसेच सुप्रभात महिला मंडळ या संस्थांनी मदत केली. तसेच केपीआयटी कमिन्सकडून कामे सुचवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली. ‘सेंटर फॉर एन्व्हॉयर्नमेंट एज्युकेशन’ या संस्थनेही कोणकोणती कामे नागरिक आपल्या भागात सुचवू शकतात, याची यादी उपलब्ध करून दिली होती. रस्ते दुरुस्ती, विजेचे दिवे, झोपडपट्टीतील सुधारणा कामे, पाणीपुरवठा वगैरे स्वरूपाची कामे नागरिकांना सुचवता येणार होती. त्याप्रमाणे ती सुचवली गेली आहेत, अशी माहिती जनवाणीतर्फे नईम केरुवाला यांनी दिली. महापालिकेने अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे नागरी सुविधा वाढवण्याची कामे नागरिक सुचवू लागले आहेत. पुढील टप्प्यात सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सतर्फे नागरिकांच्या या अंदाजपत्रकाचे प्रभाग पातळीवर विश्लेषण केले जाणार असून त्याची पुस्तिकाही प्रसिद्ध केली जाणार आहे. लोकसहभागातून अंदाजपत्रक या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे महापालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी सांगितले.

Story img Loader