सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातील ३० लाख १२ हजार रुपये किमतीचा ३४ टन तांदूळ काळय़ा बाजारात विक्री करण्यासाठी नगर जिल्ह्यातून गुजरातमध्ये नेताना दोन मालमोटारींसह जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. बाभळेश्वर येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. चौघा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वस्त धान्य दुकानातील सरकारमान्य तांदूळ पाथर्डी येथून दोन मालमोटारींमध्ये काळय़ा बाजारात विक्री करण्यासाठी गुजरातमध्ये नेला जात असल्याची माहिती नायब तहसीलदार राहुल कोताडे यांना मिळताच त्यांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लोणी पोलिसांच्या मदतीने बाभळेश्वर येथे सापळा लावला. त्यात या दोन मालमोटारी (क्रमांक एमएच १५ एई १५०० व एमएच ०४ डीके २२७०) आढळल्या. तपासणी केली असता त्यात तांदळाच्या ५० किलोच्या प्रत्येकी ३४० गोण्या अशा एकूण ६८० गोण्या होत्या, जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी रामदास भीमराव शिरसाठ (टाकळीमानुर ता. पाथर्डी), युसूफ हसन पठाण (रा. मानूर, ता. शिरूर, जि. बीड), बाळासाहेब नागरगोजे (रा. चिंचपूर, ता. पाथर्डी), दादा अंजीर बटुळे (रा. भारजवाडी, ता. पाथर्डी) यांना अटक करण्यात आली. ते चालक व क्लीनर आहेत. पाथर्डी येथील रेणुका ट्रेिडग कंपनीचा मालक विष्णू ढाकणे याचाही आरोपी म्हणून या गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. त्यानेच हा उद्योग केल्याचे पोलिसांनी सांगितले. मका आहे असे भासवून हा सरकारी तांदूळ गुजरातला नेला जात होता. नायब तहसीलदार कोताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये लोणी पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला.
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदळाची मोठय़ा प्रमाणात काळय़ा बाजारात विक्री होत असल्याचे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत. पाथर्डी येथील रेणुका ट्रेिडग कंपनीचा मालक विष्णू ढाकणे याने हा सरकारी तांदूळ कोणाकडून घेतला व गुजरात राज्यात कोणत्या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी जात होता याचा शोध पोलीस घेत असून, तपासात हे उघड झाल्यास सरकारी धान्य काळय़ा बाजारात विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट सापडू शकेल.  

Story img Loader