अमरावती पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तब्बल ३५ पदे रिक्त असल्याने यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. एकीकडे सुमारे १ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित असताना अधिकाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न पोलीस आयुक्तालयाला अधिकच भेडसावू लागला आहे. पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्तांची १ जागा रिक्त आहे. याखेरीज सहायक पोलीस आयुक्तांच्या २, पोलीस निरीक्षकांच्या ७ आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या २५ जागा अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत.
विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाऱ्यांशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांची गरज जाणवू लागली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलाला सक्षम बनवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा गृह मंत्रालयाकडून सातत्याने केला जात असला, तरी अमरावती पोलीस आयुक्तालयाकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात सर्व प्रकारच्या गुन्ह्य़ांच्या संख्येत ४२१ ने घट होऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा १० टक्क्यांनी वाढल्याचा दावा पोलीस आयुक्त अजित पाटील यांनी केला आहे. पण, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रशासकीय कामकाज करून घेताना ओढाताण होत असल्याचे त्यांनीही मान्य केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघातात वर्षभरात ६० जणांचे बळी गेले. विनयभंगांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. घरफोडीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी अलीकडच्या काळातील काही मोठय़ा घरफोडय़ांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वर्षभरात हत्येच्या २३ घटनांची नोंद झाली. इतर गंभीर गुन्ह्य़ांच्या संख्येत झालेली लक्षणीय घट ही पोलीस आयुक्तांसाठी दिलासा देणारी बाब असली, तरी यंत्रणेवरचा ताण वाढल्याचे जाणवू लागले आहे.
अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील राजापेठ, गाडगेनगर, बडनेरा आणि फ्रेझरपुरा या चार पोलीस ठाण्यांचे विभाजन करून साईनगर, तपोवन आणि एमआयडीसी या तीन नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. अमरावती शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असताना या चार पोलीस ठाण्यांवर जादा भार येत असल्याचे दिसून आले आहे. या तीन नवीन पोलीस ठाण्यांसाठी तीनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे.  पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकूण १०४० पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. मंत्रालयीन वर्ग ३ आणि ४ च्या ६५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता पोलीस आयुक्तालयाला आहे. याशिवाय, दंगानियंत्रण पथकासाठी (आरसीपी) ११३ आणि जलद प्रतिसाद पथकात (क्यूआरटी) ४ पोलीस उपनिरीक्षक, तसेच ३२ पोलीस शिपायांची भरती केली जावी, असा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. अमरावतीत पोलीस आयुक्तालयाची नवीन सुसज्ज इमारत उभी झाली. पण, या इमारतीत नवीन फर्निचरची वानवा आहे. फर्निचर खरेदीसाठी २ कोटी २० लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तो एकाच वेळी मंजूर होणे शक्य नसल्याने तात्पुरती गरज भागवताना उपलब्ध निधीतून फर्निचर खरेदी केले जात आहे. याशिवाय, प्रशासकीय ११ इमारतींच्या बांधकामाचा विषयही प्रलंबित आहे. यासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यात मुलांचे आणि मुलींचे वसतीगृह, एम.टी. वर्कशॉप, दवाखाना, खानावळ, जिम्नॅॅशिअम, डिपार्टमेंटल स्टोअर आदींचा समावेश राहणार आहे. दोन सहायक पोलीस आयुक्तांच्या नवीन प्रशासकीय इमारतींच्या उभारणीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा