येथील दुय्यम कारागृहात क्षमतेपेक्षा जादा झालेल्या ३५ कैद्यांची औरंगाबाद येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृह व नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर कैद्यांना वर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे सर्व आरोपी खून, बलात्कार, दरोडा, बनावट नोटा प्रकरण, पाकीटमार, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणे आदी गुन्हय़ातील आहेत.  
कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात एकूण चार बराकी असून, त्यात कोपरगाव, शिर्डी, राहाता व लोणी या एकूण चार पोलीस ठाण्यांचे न्यायालयीन चौकशीतील कैदी ठेवण्यात येतात. १६ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सुमारे ७० ते ७२ कैदी होते. त्यांची सुरक्षा, औषधोपचारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळेही तहसीलदार राहुल जाधव व निवासी नायब तहसीलदार तुकाराम डावरे यांनी पुढाकार घेऊन हे कैदी अन्यत्र पाठवण्याच्या प्रयत्नात होते.  
या कारागृहामध्ये शिर्डी येथील अल्पवयीन बलात्कार प्रकरणातील क्रूरकर्मा सुनील ऊर्फ पप्पू सुरेश साळवे याच्यासह अनेक गंभीर गुन्हय़ातील आरोपी होते. कारागृहास संरक्षक भिंत नसल्याने तसेच पोलीस बंदोबस्ताची असलेली कमी संख्या त्यामुळे त्यांच्या संरक्षणाविषयी मोठी चिंता निर्माण झाली होती. त्यामुळे तुरुंग प्रशासनावर व सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण पडत होता. या पाश्र्वभूमीवर ३५ कैद्यांना औरंगाबाद व नाशिकरोड कारागृहात वर्ग केले आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सध्या २० कैदी या कारागृहात आहेत.

Story img Loader