नाशिक महापालिकेच्या ११ मार्च ते १२ डिसेंबरदरम्यान एकूण ५१ सर्वसाधारण सभा झाल्या असून त्यातील १७ सभा तहकूब झाल्या आहेत. नगरसेवकांच्या सभाभत्त्यांसह अल्पोपाहारावर आतापर्यंत तब्बल ३५ लाख ८९ हजार ८३३ रुपये रक्कम खर्ची पडल्याचे उघड झाले आहे.
या बाबतची माहिती माहितीच्या अधिकारावरील उत्तरात प्राप्त झाली आहे. माहिती अधिकारात ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी ही माहिती मिळविली. त्यांच्या अर्जावरील उत्तरात महापालिकेने नगरसेवक, महापौर, उपमहापौर, समित्यांचे सभापती, गटनेते यांना दरमहा साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येते, असे म्हटले आहे. सभा भत्ता शंभर रुपये असला तरी त्याची कमाल मर्यादा चारशे रुपये असल्याने मानधनासह प्रत्येकी सात हजार नऊशे रुपये संबंधितांना दरमहा अदा केले जातात. या सभांमध्ये सदस्यांसाठी अल्पोपाहाराची खास व्यवस्था केली जाते. कधीकधी सभा इतक्या लांबतात की केवळ अल्पोपाहारच नव्हे, तर भोजनाचाही खास बेत रंगतो. सभागृहात एकमेकांची उणी-दुणी काढणारी मंडळी या स्नेहभोजनाचा एकत्रितपणे आस्वाद घेतात, असे अनेकदा पाहावयास मिळते. उपरोक्त सभांमध्ये अल्पोपाहारावर खर्च झालेली रक्कम ३५ लाखांहून अधिक आहे. दरम्यान, सभागृह नेते व विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना चहापान खर्च दरमहा एक हजार पावेतो दिला जातो. साधारणपणे कोणत्याही प्रकारचा कार्यालयीन खर्च दिला जात नसला तरी कार्यालये, फर्निचर, कर्मचारी महापालिकेचे असतात. मोटारवाहनांच्या खर्चाबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचे माहिती अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Story img Loader