माळशिरस तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मतदारांत नैराश्य असले तरी उमेदवारांमध्ये मोठा उत्साह जाणवत आहे. त्यातूनच आपापसातील गटबाजी उघड होत गावागावांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चढाओढ होऊन एकूण ३८० जागांसाठी १७४० अर्ज दाखल झाले आहेत. सातत्याने बिनविरोध होणाऱ्या तालुक्यातील पाणीव ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही या वेळी केवळ ९ जागासांठी ५० अर्ज दाखल झाल्याने प्रस्थापितांवरील संताप उघड झाला आहे.
तालुक्यातील प्रत्येकी १७ जागा असणाऱ्या माळशिरस, वेळापूर, यशवंतनगरबरोबरच १५ जागा असणाऱ्या निमगाव, खंडाळी (दत्तनगर) या मोठय़ा ग्रामपंचायतींबरोबरच ११ जागांच्या फळवणी, कोळेगाव, तामसीदवाडी, मेडद, माळेवाडी (अ.) तिरवंडी, पिसेवाडी, बागेवाडी, पुरंदावडे, गुरसाळे, चौंडेश्वरवाडी व जांबूड तसेच ९ जागांच्या मोटेवाडी, तरंग फळ, उघडेवाडी, इस्लामपूर, कचरेवाडी, नेवरे उंबरे (द.) पाणीव, आनंदनगर, मार्कडवाडी, चांदापुरी, संगम, पठाणवस्ती व पळस मंडळ, ७ जागांच्या धानोरे, तांबेवाडी, लोंढेमोहितेवाडी, माळेवाडी (बो.) व १३ जागांचे सदाशिवनगर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत.
यापैकी बहुतेक ग्रामपंचायतींची सरपंचपदे सर्वसाधारण असल्याने या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली असून, १६ नोव्हेंबर या उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसानंतर जरी चित्र स्पष्ट होणार असले तरी केवळ यशवंतनगर वगळता कुठेही बिनविरोध होण्याची चिन्हे उरली नाहीत.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पराभव करणाऱ्या माजी आमदार श्यामराव पाटील यांच्या पाणीव गावात तेव्हापासून त्यांचाच एकछत्री अंमल असल्याने आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होत होत्या. मात्र तेथेही प्रस्थापितांविरोधात असंतोष वाढल्याने या वर्षी निवडणुका जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला या गावातील प्रस्थापितांच्या विरोधातील असंतुष्ट गटाने एकत्र येऊन मोहिते पाटील यांच्याशी जवळीक साधली.
या माध्यमातून सुमारे ३५ वर्षांनंतर प्रथमच पाणीव गावात गेलेल्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सहकारमहर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते
पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांचे या गटाने अतिशय जल्लोषात स्वागत केले व निवडणूक लढवण्याची मुहूर्तमेढ रोवली व बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली.
या तालुक्यात मोहिते पाटील विरोधक व समर्थक असेच दोन गट असून, वेगवेगळय़ा पक्षांत
विखुरलेले विरोधक निवडणुकीच्या वेळी मात्र एकत्र येऊन एकजुटीने विरोध करतात. त्यातच गेली दोन वर्षे विरोधक मंडळी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सामील झाले असून, गेल्या दोन वर्षांपासून ऊसदराच्या संदर्भातील वाढता तिढा व त्यासाठी दरवर्षी होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन या विरोधकांच्या पथ्यावर पडले आहे. त्या माध्यमातून त्यांना आयते व्यासपीठ व कळीचा मुद्दा गवसला आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही विरोधकांना त्याचा फायदा होऊन त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चक्क निम्म्या निम्म्या जागा मिळवल्या. सध्याही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या ऊसदरासंबंधीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन फारसे ताणले नसले तरी शेतकऱ्यांच्या
जिव्हाळय़ाचा तो प्रश्न असल्याने या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही व तसे झाल्यास आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोहिते पाटील गटासाठी ती धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक मोहिते पाटील व विरोधकांसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे व गोरगरीब मतदारांची या वर्षीची दिवाळी चांगली होणार असल्याचे दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा