महापालिकेची तिसरी निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होणे निश्चित असल्याने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार ७५ सदस्य निवडून येणार असून शहरात ३७ प्रभागांची रचना तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन, तर शेवटच्या प्रभागातून तीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. सुमारे १२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग राहणार आहे. प्रभाग आरक्षणाविषयी आता सर्वाना उत्सुकता आहे.
राज्यभर गाजलेल्या तसेच ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह अनेक माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक व अधिकाऱ्यांना तुरुंगवास घडविणाऱ्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर पालिकेची निवडणूक होणार असल्याने तिला महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्कालीन जळगाव पालिका व आताच्या महापालिकेत सुमारे २८ वर्षे इतकी दीर्घ काळ सत्ता गाजविणाऱ्या आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधक आतापासूनच कामाला लागले असले तरी सर्वच पक्ष स्वबळाची भाषा करीत आहेत. मनसेनेही सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार देण्याचे निश्चित केले असल्याने जैन गटाविरोधात महाआघाडी करण्याचे मनसुबे यशस्वी होण्याची शक्यता सध्यातरी दूरच आहे. तरीही आ. सुरेश जैन आणि त्यांची सर्व सूत्रे सांभाळणारे माजी महापौर प्रदीप रायसोनी हे दोन्हीही कोठडीत असल्याने त्यांच्या गटाच्या जागांमध्ये घट होईल, असे म्हटले जात आहे.   आमदारांच्या    अनुपस्थितीत  त्यांचे भाऊ रमेश जैन व नितीन लढ्ढा हे आघाडी सांभाळत आहेत.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर २०११ च्या जनगणनेनुसार नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. या रचनेला अंतिम स्वरूप मिळणे अद्याप बाकी आहे. सुरेश जैन यांच्या उपस्थितीचा फायदा घेण्यासाठी व महापालिका ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री गुलाब देवकर यांनी व्यूहरचना केली असल्याचा आरोप जैन गटाच्या नगरसेवकांकडून केला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार चार लाख ६० हजार इतकी शहराची लोकसंख्या असल्याने १२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग आणि त्यात सात हजारांवर मतदार अशी प्रभाग रचना नव्या नियमानुसार करण्यात आली आहे. हरकती मागवून आणि त्यावर सुनावणी झाल्यावरच प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी दिली जाते. प्रभाग रचना अंतिम नसली तरी या रचनेत  विशेष फरक राहणार नसल्याने विद्यमान नगरसेवक व इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा