उत्तराखंडातील जलप्रलयात बेपत्ता झालेल्या विदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांचा अजूनही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय व खात्यातील सहकारी कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत. राज्यातील १८०० यात्रेकरू संपर्कात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. नागपुरातील ३७ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी यांनी सांगितले. प्रशासकीय पातळीवर यात्रेकरूंच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. परंतु, या प्रयत्नांना यश आलेले नाही.
नागपूरच्या शालिनी खोंड, कुसुम पराते, श्रीकांत हातमोडे, महेश खेतान, सरोज, ऋ,षी, लोकेश, रश्मी, इशान साबू, अग्रवाल परिवारातील विमलादेवी, लक्ष्माकांत, भावना, राशी, खुशी, सृष्टी, महि अग्रवाल तसेच विनोद आणि आरती खुरसनकर, बाबूराव, चंद्रभागा आणि बरखा चौधरी, अजय साहू, अर्चना, रिया, कन्हैय्या, साहू, अशोक, प्रकृती/इंदू करण, धरणी योगेश जयस्वाल, प्रदीप स्वरुपा, प्रीतम गुल्हाने, हेमलता बावनकर सहारे, स्मिता पौनीकर यांचा अद्यापही संपर्क झालेला नाही. राज्यभरातील वृत्तानुसार अनेक यात्रेकरू परतले असून काही उत्तराखंड परिसरात परतीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनातर्फे ऋषिकेश, हरिद्वार व डेहराडून येथे तीन मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. हरिद्वारच्या मदत केंद्राची जबाबदारी नागपूर विभागातील पाच अधिकाऱ्यांकडे असून चंद्रपूरच्या जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर आणि गोंदियाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी हेमलता बावनकर यांचा गेल्या १६ जूनपासून ठावठिकाणा लागलेला नाही.
या दोघींसोबत विनोद व आरती खुरसनकर, प्रदीप व स्वरूपा गुल्हाने आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा केदारनाथला गेले होते. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांनी एक टॅक्सी भाडय़ाने घेतली होती. या टॅक्सीचा चालकसुद्धा १६ जूनपासून बेपत्ता आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी शासनाच्या वतीने तेथे गेलेले सनदी अधिकारी विकास खारगे यांनीही या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. स्मिता पौनीकर यांचे बंधू डॉ. नितांत पौनीकर दिल्लीला पशुसंवर्धन खात्यात आहेत. तेसुद्धा दोनदा उत्तराखंडला जाऊन आले. पण या सातही जणांविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या राज्यात सुरू असलेले मदत व बचाव कार्य आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. आज लष्कराने सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात आल्याचे जाहीर केल्याने पौनीकर व बावनकर कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. आठ दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला एक संदेश पाठवून या सर्वाचा शोध लागला, असे कळवले होते. त्यामुळे कुटुंबीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. मात्र हा संदेश चुकीचा असल्याचे नंतर चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. आता मदतकार्य जवळजवळ संपले असले तरी नागपूर व चंद्रपूरच्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अजूनही या सर्वाचा शोध घेणे सुरूच ठेवले आहे. शोध सुरू असला तरी आता अधिकारीच या सर्वाविषयी शंका व्यक्त करू लागले आहेत. स्मिता पौनीकर यांचे बंधू तुषार पौनीकर यांच्याशी संपर्क साधला असता अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही, असे ते म्हणाले. लष्कराने मदतकार्य संपल्याचे जाहीर केले असले तरी चारधाम परिसरातील दुर्गम भागात अनेक पर्यटक अडकलेले आहेत, अशी माहिती मिळत असल्याने या सर्वाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा