सतत टंचाईची झळ बसणाऱ्या येथील पालिकेच्या दोन लाख १२ हजार ९९८ रुपये शिलकी अंदाजपत्रकात पाणी योजनेसाठी ३८ कोटी रुपये दर्शविण्यात आले आहेत. २०१३-१४ च्या या अंदाजपत्रकास शुक्रवारी पालिकेने मंजुरी दिली. जमा बाजूस ३४ कोटी ७१ लाख २४ हजार ९५८ रुपये, तर खर्च बाजूस ३४ कोटी ६९ लाख १२ हजार रुपये दर्शविण्यात आले आहेत.
नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आलेल्या या अंदाजपत्रकात कोणतीही नवी करवाढ सुचविण्यात आलेली नाही. दलित वस्तीसाठी आठ कोटी, १३ वा वित्त आयोगांतर्गत एक कोटी, राज्यस्तर नगरोत्थान योजनेतील ८० टक्के राज्य आणि २० टक्के पालिकेच्या हिश्शासाठी, अल्पसंख्याक योजनांसाठी १५ ते २० लाख रुपये अपेक्षित. याशिवाय अग्निशमन दल आणि कर्मचारी निवासस्थानासाठी पालिकेचा हिस्सा ४६ लाख रुपये, पाणीपुरवठा वीज बिलापोटी एक कोटी रुपये, विविध विकासकामांच्या लोकवर्गणीपोटी एक कोटी रुपये, सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेसाठी दहा कोटी रुपये, गटारी बांधकाम २० लाख रुपये या ठळक तरतुदी अर्थसंकल्पात आहेत.
अंतर्गत लेखा परीक्षक सतीश जोशी यांनी अंदाजपत्रक मांडले. चर्चेनंतर विरोधी पक्षनेते संतोष बळीद यांनीही मंजुरीस सहमती दर्शविली. या वेळी पालखेड धरणातून त्वरित पाणी मिळावे यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन बळीद यांनी केले.