ग्रामीण व राष्ट्रीयीकृत बॅंकांना ९०७.३१ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यापैकी आजपर्यंत ३८ टक्के वाटप झाले असून, उर्वरित कर्ज वाटप युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सांगितली.
जिल्ह्य़ाातील पीककर्ज वाटपाचा आढावा वेळोवेळी रिझव्‍‌र्ह बॅंक, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, मुख्यमंत्र्यांमार्फत नियमीत घेतला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्य़ातील पीककर्ज वाटपाच्या प्रगतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर श्ेातकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम पूर्ण करण्याबाबत आदेश दिले आहे. सार्वजनिक बॅंकांना पीक वाटपाच्या एकूण दिलेल्या उद्दिष्टांपैकी किमान ८० टक्के उद्दिष्ट ३० जूनपर्यंत पूर्ण करावयाचे होते. आजपर्यंत ३८ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. ते वेळीच पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दर आठवडय़ाला अग्रणी बॅंक व्यवस्थापकांच्या उपस्थितीत पीककर्ज वाटपाच्या संबंधाने आढावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना वेळीच कर्ज पुरवठा व्हावा, यादृष्टीने सहकार विभागाने संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येक बॅंक व त्यांच्या शाखांना उद्दिष्ट दिलेले असून शेतकऱ्यांकडून पीककर्ज वाटपासंबंधीचे फॉर्म भरून घेऊन वेळीच राष्ट्रीयीकृत बॅंकेत दाखल करण्याचे काम युध्द पातळीवर चालू आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप वेळीच व्हावे, या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना त्यांच्या स्तरावरून योग्य त्या उपाययोजना करण्याचे सुचविले आहे, तसेच सार्वजनिक बॅंकांच्या कर्जवाटपाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेऊन व शेतकऱ्यांना वेळीच कर्जवाटप होईल, याची दक्षता घेण्याबाबत निर्देशही दिले आहेत.
जिल्ह्य़ातील पात्र शेतकऱ्यांनी वेळीच सार्वजनिक बॅंकांशी संपर्क साधून पीककर्ज वाटपासंबंधी अर्ज सादर करावे. पीक कर्ज मिळवण्यासाठी काही अडचणी भासल्यास प्रत्येक तालुक्यातील सहाय्यक निबंधकाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader