िपपरी-चिंचवड शहरातील ‘बीआरटीएस’ यशस्वी करण्यासाठी महापालिकेने कॅनडा येथील ‘अनुभवी’ कंपनीचा बहुमोलाचा सल्ला घ्यायचे ठरवले असून त्यासाठी तब्बल चार कोटी ५० लाख रुपये मोजण्याची तयारी दाखवली आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या प्रशासनाने आयत्यावेळी स्थायी समितीत हा प्रस्ताव दाखल केला व सदस्यांनीही तो तत्काळ मंजूर करण्याची तत्परता दाखवली आहे.
कॅनडा येथील ‘आयबीआय ग्रूप’ कंपनीची पालिकेच्या ‘बीआरटीएस’ प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने २२ फेब्रुवारीच्या बैठकीत आयत्यावेळी आणला गेला व बिनबोभाट मंजूरही केला. एकूण खर्चातील ५० टक्के रकमेची प्रतिपूर्ती जागतिक बँकेकडून होणार आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम केंद्र शासनाच्या शहरी निर्माण खात्याकडून अनुदान स्वरूपात तर दहा टक्के रक्कम महापालिकेला खर्च करावी लागणार आहे. जागतिक बँकेच्या निकषानुसार व त्यांच्याच प्रतिनिधींनी केलेल्या शिफारशीनुसार कॅनडाच्या कंपनीला नियमानुसार हे काम देण्यात येत असल्याचा युक्तिवाद पालिकेकडून करण्यात आला असून ही कंपनी अनुभवी असल्याचे प्रमाणपत्रही दिले आहे. खर्चाची ९० टक्के रक्कम बाहेरून येणार असल्याचे सांगत पालिका अधिकाऱ्यांकडून या खर्चाचे समर्थनही केले जात आहे. प्रस्तावात नमूद केल्यानुसार, शहरात बीआरटीएस प्रकल्प यशस्वी करण्यासाठी िपपरी पालिकेला सल्ला देण्याचे काम कॅनडाच्या कंपनीला करायचे आहे. चार वर्षांसाठी कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यासाठी कंपनी सर्वप्रथम आवश्यक माहिती एकत्रित करणार असून पूर्णपणे सव्र्हेक्षण करणार आहे. बीआरटी सुरू झाल्यानंतर ती यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत ठेवावी व कशी राबवावी, याचे मार्गदर्शनही करणार आहे. देखभाल करण्याबरोबरच काही त्रुटी असल्यास त्या दाखवून देण्याचे कामही कंपनी करणार आहे. दर महिन्याला कंपनी पालिकेला अहवाल देणार आहे. कंपनीचा निवासी अधिकारी पालिका अधिकाऱ्यांसमवेत काम करणार आहेत. बीआरटीबाबतचे अहवाल कंपनीकडून महापालिका व पीएमपीएलला देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. तथापि, हा प्रस्ताव घाईने मांडण्याचे प्रयोजन काय, खर्चाची रक्कम इतकी का, सल्लागार म्हणून कॅनडाची कंपनीच का, यांसारख्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळू शकले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा