सोलापूर महापालिकेच्या खासगी तत्त्वावरील बायोगॅस एनर्जी सिस्टिम प्रा. लि. मध्ये बायोगॅस टाकीवर काम करीत असताना अचानकपणे स्फोट होऊन त्यात दोघा कामगारांचा मृत्यू व पाच कामगार जखमी झाल्याप्रकरणी कंपनीच्या संबंधित चौघा अधिकाऱ्यांना जबाबदार धरून अटक करण्यात आली.
रामनरेश रामस्वरूप माथूर (वय ४५, रा. गंगानगर, होटगीरोड, सोलापूर),  प्रदीपकुमार अच्युतानंद साहू (वय ३४, युनायेड आर्किड, सोलापूर), शिवाजी गणपती लेंगरे (वय ३६, कावळे रेसिडेन्सी, रोहिणीनगर, विजापूर रोड, सोलापूर) व मनोज बच्ची चौधरी (वय ४६, रा. उमानगरी, जुना पुणे नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
काल सोमवारी दुपारी नव्या तुळजापूर नाक्याजवळील महापालिकेच्या खासगी तत्त्वावरील बायो एनर्जी सिस्टिम प्रा. लि. या वीजनिर्मिती प्रकल्पात गॅस टाकीचा स्फोट होऊन त्यात दोघा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर अन्य पाच कामगार जखमी झाले होते. प्रकल्पस्थळावरील बायोगॅस टाकी डायजेस्टर बी या टाकीत ज्वलनशील पदार्थ असल्याचे माहीत असताना त्याबाबत पुरेशी काळजी घेण्यात आली नाही. कामगारांकडून टाकीच्या छतावर वेल्िंडगचे काम करून घेताना टाकीला छिद्र पडले आणि गॅस टाकीचा स्फोट झाला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी फिर्याद नोंदविली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिकंदर नदाफ हे करीत आहेत.