महापालिकेने तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी १५ लाख, तसेच साई व नागझरीच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ६७ लाख रुपये मंजूर करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत शहराला पाणीपुरवठा होतो. ही योजना पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शहरातील जलवाहिन्यांतून अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गळती सुरू आहे. मागील काही वर्षांत प्राधिकरणाने दुरुस्तीची कुठलीही कामे केली नाहीत. परिणामी दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नळाला तोटय़ा बसवल्या जात नाहीत. पाणीपट्टी वसुली होत नाही. जलवाहिन्या दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या योजनेचे काम पूर्ण विस्कळीत झाले आहे. मांजरा धरणात ३५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. त्यातून जीवन प्राधिकरण लातूरसाठी दररोज ४५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करते. हे प्रमाण दरमाणसी दरदिवशी १०० लिटर एवढे आहे. आठवडय़ातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनपाने तातडीच्या पाणीपुरवठा योजना राबवून पाणीपुरवठा करावा, अशा सूचना पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केल्या आहेत. विंधनविहिरी, मोटारींची दुरुस्ती करणे, जलकुंभ बांधणे आदी कामांचा आराखडा तयार करून सरकारला सादर केला. या तातडीच्या योजनांसाठी वरील निधी मंजूर   करण्याची   मागणी मनपाने केली आहे.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 crore for water managment in latur