सिरोंचाच्या जंगलातून नदीच्या मार्गाने लगतच्या आंध्रप्रदेशात तस्करी करणाऱ्या सागवान टोळीने वन कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री उशिराची आहे. दरम्यान, या तस्करांकडून २० बैल बंडय़ांसह नऊ लाखाचे सागवान जप्त करण्यात वनखात्याला यश आले. यातील दोन जखमींना चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ांतर्गत येणाऱ्या सिरोंचा तालुक्यालगतच्या आंध्रप्रदेशातील सागवान तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रातील जंगल परिसरात दाखल व्हायचे. सागवान तोडायचे आणि नदीच्या मार्गाने आंध्रप्रदेशात घेऊन जायचे. तेथे सोन्याच्या किंमतीत सागवान विकायचे, असा हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांंपासून सुरू आहे. ही तस्करी थांबवण्यासाठी वनखात्याने कंबर कसली असून स्वतंत्र पथक तैनात केले आहे. हे पथक जंगलात अभियान राबवित असतांना वनमजूर जयराम गुरनुले यांना तस्करांनी गुरुवारी पकडून जंगलात नेले होते. त्यांच्या शोधात वनकर्मचारी जंगलात फिरत होते. झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या रमेशगुडम बिटात तस्कर सागवान तोडत असल्याची माहिती वनखात्याला मिळाली. या माहितीच्या आधारावर रेपनपल्ली, जिमलगट्टा, बामनी व झिंगानूर वनपरिक्षेत्रातील ६५ कर्मचाऱ्यांचे पथक तस्करांच्या शोधात जंगलात गस्त घालत होते. यावेळी अचानक दिडशेच्या संख्येत असलेल्या तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात आदर्श रेड्डी, झिंगानूरचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार, वनरक्षक गणेश अडगोपूलवार, वनमजूर जयराम गुरनुले हे जखमी झाले. यातील अडगोपूलवार व गुरनुले हे गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनपरिक्षेत्राधिकारी चांदेवार व आदर्श रेड्डी यांच्यावर सिरोंचा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी वन कर्मचाऱ्यांनी २० बैल व १६ बंडय़ांसह १३.७० घनमीटर सागवान लाकूड जप्त करण्यात आले. या साहित्याची एकूण किंमत नऊ लाख रुपये असल्याची माहिती वनखात्याने दिली. आदर्श रेड्डी, कमलापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी अतुल देवकर, रेपनपल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप बदनवार, झिंगानूरचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, तस्करांनी गुरनुले यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले व जंगलात आणून टाकले होते. वन कर्मचाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा