रस्त्यात अडवून मोटारीतील दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवत दूरवर नेऊन त्यांच्याकडील सव्वाचार लाखांचा ऐवज लुटला. तालुक्यातील घारगाव शिवारात रस्तालुटीची ही घटना घडली असून पोलीस आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रामचंद्र नामदेव सांगळे आणि विलास भगवंत ताम्हाणे हे दोघे पुणे येथे गेले होते. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पुण्याहून परतताना घारगाव शिवारातील आंबीखालसा येथे पाठिमागून भरधाव आलेल्या फिगो मोटारचालकाने त्यांच्या मोटारीला मोटार आडवी घातली. मोटारीतून उतरलेल्या चौघांनी थेट सांगळे व ताम्हाणे यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. पिस्तुलाचा धाक दाखवतच त्यांनी सांगळे यांच्या गाडीचा ताबा घेत ती गाडी पुन्हा मागे वळवून आळेफाटय़ाहून कल्याण-नगर मार्गाने िपपळगाव जोगा धरणाच्या भरावावर नेली. तेथेही त्यांनी सांगळे व ताम्हाणे यांना पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केली. त्यांच्याजवळ असलेली गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठय़ा, मोबाईल, ९० हजाराची रोकड आणि त्यांच्याकडील फियास्टा मोटार घेऊन त्यांना तेथेच सोडून देत तेथून पोबारा केला. त्यानंतर सांगळे व ताम्हाणे यांनी जवळच असलेल्या एका हॉटेलचालकाच्या मदतीने मोबाईलवरुन कोपरगावातील नातेवाईकांना आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगत त्यांच्याकडे मदत मागितली. कोपरगाव येथील त्यांच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पुणे पोलिसांनीही तपासाची चक्रे हलवत ओतूर पोलिसांकडे हे प्रकरण सोपविले.
पिस्तुलाच्या धाकाने ४ लाखांना गंडा
रस्त्यात अडवून मोटारीतील दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवत दूरवर नेऊन त्यांच्याकडील सव्वाचार लाखांचा ऐवज लुटला. तालुक्यातील घारगाव शिवारात रस्तालुटीची ही घटना घडली असून पोलीस आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले आहेत.
First published on: 12-01-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 lacs stolen showing pistol threaten