विठ्ठला, राज्यातील शेतकरी राजाला सुखी ठेव, जनावरांना चारापाणी मिळू दे, वेळेवर पाऊस पडून पाण्याचा प्रश्न सुटू दे, असे साकडे सोलापूरचे पालक मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज कार्तिकी एकादशीच्या महापूजेनिमित्त घातले. यंदा कार्तिकी एकादशीला चार लाखांवर भाविक उपस्थित होते तरीही ही संख्या दुष्काळ, महागाई, शेतकरी आंदोलन यामुळे नेहमीपेक्षा कमी असल्याचे जाणकारांनी सांगितले. दुपारी विठ्ठलाची मूर्ती रथात बसवून प्रदक्षिणा घालण्यात आली.
दरवर्षी आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्याने या वेळी ढोबळे यांच्या हस्ते महापूजा झाली. ढोबळे व त्यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांनी मनोभावे विठ्ठलाची पूजा केली. त्यांच्यासमवेत दर्शन रांगेतील पहिले वारकरी धर्मा विठू कांबळे व त्यांच्या पत्नी रंजना धर्मा कांबळे (रा.धुंदवडे, ता.गगनबावडा) या शेतमजूर दांपत्यालाही पूजेचा मान मिळाला. कांबळे दांपत्याने या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. कांबळे दांपत्याचा ढोबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांना एस.टी.चा वर्षभर मोफत प्रवासाचा पास देण्यात आला. ढोबळे दांपत्याचा सत्कार हा अण्णा डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार उल्हास पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जि.प. कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, बाबासाहेब बेलदार, तहसीलदार सचिन डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम,सदस्य बाळासाहेब बडवे, जयंत भंडारे आदी उपस्थित होते.
मंदिर समितीच्या वतीने सत्कार केल्यानंतर पालकमंत्री ढोबळे यांनी सांगितले की, कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्याची प्रथा आहे, ती या वेळी खंडित झाली.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सारी पंढरी नगरी विठ्ठलाच्या नामघोषाने दुमदुमली असून संत ज्ञानेश्वर मंडप हा वारकऱ्यांनी भरला आहे. या वेळी पुरेसे वाहतूक पोलिस असतानाही गाडगेमहाराज मठाजवळ वाहतूक कोंडी झाली. सावरकर पुतळा ते इंदिरा गांधी चौक हा रस्ता पूर्ण बंद केल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढली. पोलीस निरीक्षक गावडे यांच्या काळातील ही पहिलीच कार्तिकी यात्रा असून त्याचा फायदा उठवित अवैध वाहतूक, दारू, मटका, जुगार असे प्रकार चालू होते.
वारक ऱ्यांच्या सोयीसाठी एसटी व रेल्वेने जादा गाडय़ा सोडल्या होत्या. वारकऱ्यांनी मठ, वाडे धर्मशाळा येथे वास्तव्य केले.
कार्तिकी यात्रेला पंढरपुरात चार लाख भाविक; पालकमंत्री ढोबळे यांच्या हस्ते महापूजा
विठ्ठला, राज्यातील शेतकरी राजाला सुखी ठेव, जनावरांना चारापाणी मिळू दे, वेळेवर पाऊस पडून पाण्याचा प्रश्न सुटू दे, असे साकडे सोलापूरचे पालक मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज कार्तिकी एकादशीच्या महापूजेनिमित्त घातले.
First published on: 25-11-2012 at 01:31 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 lakh piligrim in pandharpur for kartiki yatra