लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक खर्चावर येणारी बंधने लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा उमेदवार ठरण्यापूर्वीच नांदेड लोकसभा मतदारसंघात मोठय़ा व खर्चिक सभांचे नियोजन करून पक्षाच्या प्रचाराचा बार उडवून दिला. नांदेड लोकसभेच्या सर्व सहा विधानसभा मतदारासंघांमध्ये पक्षाच्या प्रचारसभा त्यांनी घेतल्या.
नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी कोणाला, हे पक्षश्रेष्ठींनी अजून निश्चित केले नसले, तरी खुद्द चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी अमिता, तसेच डी. पी. सावंत यांची नावे विचाराधीन आहेत. विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर हेही इच्छुक असले, तरी सर्वेक्षणातून आलेल्या अहवालाचा हवाला देत त्यांच्यासाठी अनुकूल स्थिती नाही, असे चव्हाण यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ातील प्रचारासाठी हवाई सफर करणाऱ्या चव्हाणांनी कुरुळा व सावळी येथील सभा खतगावकरांच्या गैरहजेरीत उरकून घेतल्या.
या वेळी खतगावकर नको असा सूर पक्षातील पदाधिकाऱ्यांसह तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी आधीच लावला. या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांनी सावळी (तालुका मुखेड) येथील सभेत कार्यकर्त्यांना उद्देशून तुमच्या मनासारखा उमेदवार दिला जाईल, असे सांगितले. त्यापाठोपाठ नांदेड लोकसभेसाठी चव्हाण यांच्या नावाचा विचार सुरू, अशा स्वरूपाचे वृत्त दिल्लीहून पसरले. चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. पण पक्षाने दिल्यास नाकारायची नाही, अशा भूमिकेतून त्यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे.
पहिल्या टप्प्यात अर्धापूर, तसेच सावळी व कुरुळा येथे सभा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २२ ते २३ रोजी नायगाव व भोकर विधानसभा क्षेत्रात ४ सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. बिलोली व नांदेड दक्षिणमध्येही सभा होतील, असे सांगण्यात आले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर प्रत्यक्ष निवडणुकीच्या धामधुमीत मोठय़ा सभा घेतल्यास त्यावर होणारा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट होतो, हे लक्षात घेऊन काँग्रेसने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सभा मेळाव्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू केली. असे असले, तरी सभांना गर्दी जमविण्यासाठी ग्रामीण जनतेला वाहनांमध्ये बसवून आणले जात आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. मेळाव्यांसाठी भव्य मंडप टाकण्यात येत आहेत, या सर्व खर्चाचा भार त्या त्या आमदारांवर टाकून चव्हाणांनी ‘मिशन लोकसभा २०१४’ मध्ये उडी टाकली आहे.
नांदेड शहरातील मुस्लिम समाजावर प्रभाव टाकण्यासाठी ‘उर्दू घर’चे भूमिपूजन उरकताना चव्हाण यांनी या कार्यक्रमास माजी क्रिकेट कर्णधार खासदार अझरुद्दीन यांना येथे आणले. परंतु तरीही या कार्यक्रमास अपेक्षित गर्दी जमली नाही.
मुख्यमंत्र्यांविरोधात
अझरुद्दीनचाही सूर!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर, त्यांच्या कार्यशैलीवर राज्यातील मंत्री, सत्ताधारी आमदार नाराज असल्याचे वेगवेगळ्या प्रसंगातून समोर आले. पण राज्याशी संबंधित नसलेल्या खासदार अझरुद्दीन यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीबद्दल येथे नाराजी व्यक्त  केली. बघतो, पाहतो या पलीकडे मुख्यमंत्री काहीच करीत नसल्याचा उल्लेख अझरुद्दीन यांनी केला.