पटपडताळणीत दोषी आढळल्याचा ठपका ठेवल्यानंतर शिक्षण समितीने मात्र दोषी आढळलेल्या चार शाळांची मान्यता रद्द करण्यास टाळाटाळ केली, या मुद्दय़ावर जिल्हा परिषद सदस्य गजानन पवार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत आवाज उठवताच या चार शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आला.
जिल्हय़ात झालेल्या पटपडताळणीत कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, हिंगोलीतील सदानंद प्राथमिक शाळा, कळमनुरीतील शारदा प्राथमिक विद्यालय व सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील प्राथमिक विद्यालय या शाळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित होते. पटपडताळणीत शाळा दोषी आढळून आल्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नव्हती. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रंगनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शिक्षण समितीची बैठक झाली. बैठकीत गजानन पवार, शिवाजी मस्के, दिव्या आखरे या सदस्यांनी या विषयावर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर अखेर या चार शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Story img Loader