यंदाच्या उन्हाळय़ात दुष्काळाच्या छटा सोलापूर शहर व परिसरात अधिक गडद होत असताना आता उष्णतेचेही प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. गेल्या २३ मार्च रोजी सोलापूरचे तापमान ४० अंशाच्या घरात गेले होते. त्यानंतर काहीअंशी हे तापमान कमी झाले असताना सोमवारी पुन्हा तापमानाचा पारा ४० अंशाच्या घरात गेला. त्यामुळे सोलापूरकरांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
सोमवारी सोलापूरचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. गेल्या शनिवारी, २३ मार्च रोजी हे तापमान ३९.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. त्यानंतर त्यात किंचित घट होऊन नागरिकांना दिलासा मिळाला असताना आता पुन्हा तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागल्याचे दिसून येते. शहरात एकीकडे पाणीटंचाईमुळे नागरिकांना एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असताना त्यात आता उन्हाळय़ाची तीव्रतेची भर पडली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा जास्तच त्रासदायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके  जाणवत असून, दुपारी उष्म्यातील प्रखरता वाढल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.