कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील १ हजार ८९०मेगाव्ॉट क्षमता असलेल्या कुलींग टॉवरचे ४० खांब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तीन अभियंत्यांना महानिर्मितीने तात्काळ निलंबित केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. हा प्रकार उघडकीला येऊ नये म्हणून त्याची खबरदारी घेतली जात आहे. त्या ठिकाणी जाण्याची आणि छायाचित्रे काढण्याची बंदी करण्यात आली आहे.  
कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील जुन्या संयंत्राची क्षमता कमी झाल्यामुळे नवीन केंद्र उभारण्यात येत आहे. कोराडी प्रकल्पात ६३० मेगाव्ॉटचे तीन असे एकूण १९८० मेगाव्ॉट निर्मितीचे संच उभारण्याचे काम सुरू आहे. यातच कुलिंग टॉवरचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी ५३० पिलर उभारायचे असून २६० पिलर उभे झाले आहेत. त्यातील ४० पिलर ४ मे रोजी कोसळल्याने एकच खळबळ उडाली. महानिर्मितीने सहायक अभियंता जगदळे, कनिष्ठ अभियंता अग्निहोत्री आणि थेटेरे यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात आले आहे.
कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठांना वगळल्यामुळे महानिर्मिती कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा कोटय़वधीचा प्रकल्प असून त्याची जबाबदारी मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर असूनदेखील कनिष्ठ कर्मचारी यांना दोषी ठरविण्यात आल्याने असंतोष वाढत चालला आहे.
याला थांबविण्यासाठी कार्यकारी अभियंता शेखर कपले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे बोलल्या जात आहे; परंतु त्यांच्या निलंबनाची कारवाई दडवून ठेवली असल्याचे बोलल्या जात आहे. महानिर्मितीचे मुख्य अभियंता  प्रमोद नाफडे आणि ए.एस. पराते यांनाही निलंबित करावे, ही मागणी जोर धरू लागली आहे.
सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी कोराडी जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी केली आहे.