निलंगा विधानसभा मतदारसंघातील तीन तालुक्यांसाठी सुमारे ४० कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निलंगा मतदारसंघातील देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा तालुक्यांच्या विकासासाठी आपण सरकारदरबारी पाठपुरावा करून विविध विकासकामांना मंजुरी मिळविली. निलंगा तालुक्यासाठी पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी सुमारे १२ कोटी ५१ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. नवीन पोलीस ठाण्याकरिता ५१ लाख व पोलीस वसाहतीसाठी २ कोटी ९७ लाख, औराद शहाजनी येथील पोलीस ठाण्यासाठी १ कोटी, निलंगा व अनसरवाडा येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी २ कोटी ५० लाख, रुग्णालयासाठी १ कोटी ७९ लाख यांसह विविध मार्गावरील रस्त्याच्या कामासह तालुक्यासाठी २७ कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित कामे लवकरच सुरू होणार आहेत. तालुक्यासाठी आणखी ७ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी पूल, रस्ते, गोदाम, आदींकरिता ३ कोटी ४० लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. तालुक्यासाठी आणखीन ६० लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
देवणी तालुक्यात रस्ते, गोदाम, वसतिगृह, रुग्णालय इमारत आदींसाठी ८ कोटी ९० लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. बहुतांश कामे प्रगतिपथावर असून उर्वरित कामे मार्चअखेर सुरू होणार आहेत. तसेच तालुक्यासाठी आणखीन ३ कोटी ६२ लाखांची कामे प्रस्तावित आहेत. निलंगा तालुक्यातील निम्नतेरणा प्रकल्पाच्या अंतर्गत कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी व तेरणा नदीवरील आठ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्चस्तरीय बंधाऱ्यात (बॅरेजेस) मध्ये रूपांतर करण्यासाठी ३५५ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. यातील मदनसुरी व किल्लारी २ ही दोन बॅरेजेस पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. निलंगा तालुक्यातील केदारपूर, निलंगा, शेडोळ, हाडगा, नणंद, माळेगाव, बडूर, चिलवंतवाडी या आठ तलावांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी ६ कोटी ३ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली असून या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.     

Story img Loader