राज्यावर ओढावलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात नाशिक महापालिकेने खारीचा वाटा उचलला आहे. दुष्काळ निवारणार्थ कामांसाठी पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३९ लाख ७३ हजाराची रक्कम मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीत जमा केली आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हातभार लावावा, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली होती. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी व सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, मंदिर संस्थान अशा विविध घटकांकडून शक्य त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केला जात आहे. राज्यासह धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातही दुष्काळाची दाहकता प्रकर्षांने जाणवत आहे. जिल्ह्यातील शेकडो गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. एरवी मुबलक पाणी असणाऱ्या भागात अशी स्थिती असताना ज्या भागात आधीच दुर्भिक्ष्य असते, त्या ठिकाणी परिस्थिती भयावह आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून जनावरांना चारा उपलब्ध करण्याचे आव्हान शासनासमोर आहे. या एकूणच पाश्र्वभूमीवर, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार एप्रिल महिन्यातील वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. वेतनाची ही रक्कम ३९ लाख ७३ हजार  रूपये इतकी होते. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे.