मध्यरात्रीच्या सुमारास भीतीने पळत सुटलेल्या मेंढय़ांना भरधाव रेल्वेने चिरडले. या प्रकारात ४० मेंढय़ा जागीच ठार, तर अन्य १५ मेंढय़ा जखमी झाल्या. या घटनेत मेंढपाळाचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परळी तालुक्यातील वैजवाडी शिवारात गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. शेतामध्ये राजाभाऊ साधू फुके यांच्या सुमारे ८० मेंढय़ांचा कळप चारही बाजूंनी जाळी लावून बसविला गेला होता. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक रानडुकरांच्या आवाजाने मेंढय़ा जाग्या झाल्या आणि जीवाच्या भीतीने सरावैरा धावू लागल्या. या सर्व मेंढय़ा पळतच रेल्वेरुळावर आल्या. याच वेळी परळीहून वेगाने काकीनाडा एक्स्प्रेस आली. या वेळी रेल्वेखाली सापडून सुमारे ४० मेंढय़ा ठार झाल्या, तर अन्य १५ मेंढय़ा गंभीर जखमी झाल्या. या घटनेत मेंढपाळ फुके यांचे जवळपास ५ लाखांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. रेल्वे रुळावर मेंढय़ांच्या रक्तमांसाचा अक्षरश: सडा पडला होता.

Story img Loader