तिकीट खिडक्यांसमोरील लांबच्या लांब रांगांपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने एटीव्हीएम आणि जेटीबीएस प्रणालीवर भर दिला आहे. सध्या तिकीट खिडक्यांवरून ५० टक्के प्रवासी तिकीट खरेदी करत असल्याने हा टक्का कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लवकरच ४०० एटीव्हीएम यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ४०० यंत्रांपैकी २८८ यंत्रे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. या यंत्रांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ही यंत्रे प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत.
मध्य रेल्वेवर तिकीट बुकिंग क्लार्कची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेक तिकीट खिडक्या बंद असतात. प्रवाशांना तिकीट खिडक्यांसमोर लांब रांगांमध्ये उभे राहावे लागू नये, यासाठी मध्य रेल्वेने गेल्या दोन-तीन वर्षांपासून एटीव्हीएम आणि जेटीबीएस प्रणालीवर भर दिला आहे. या दोन्ही प्रणालींद्वारे मध्य रेल्वेच्या उपनगरीय तिकीट विक्रीच्या ४० टक्के विक्री होते. यात जेटीबीएसचा वाटा १२ टक्के असून एटीव्हीएद्वारे २८ टक्के विक्री होते. हा आकडा अधिक वाढावा आणि प्रवाशांना रांगेचा सामना करावा लागू नये, यासाठी मध्य रेल्वेने हे पाऊल उचलल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर ३८० एटीव्हीएम बसवली गेली आहेत. यापैकी अंदाजे ६० यंत्रे निकामी झाली असून बदलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने १९८ जेटीबीएस केंद्रांना परवानगी दिली आहे. त्यापैकी १७५ केंद्रे सुरू असून प्रवासी त्यांचा लाभ घेत आहेत. मात्र तरीही तिकीट खिडक्यांसमोरील वाढत्या रांगा पाहून मध्य रेल्वेने आणखी एटीव्हीएम यंत्रे बसवण्याचे ठरवले आहे. मध्य रेल्वेवर एकूण ४०० नवी यंत्रे येणार आहेत. त्यापैकी २८८ यंत्रे मुंबईच्या ७४ उपनगरीय स्थानकांवर लागणार असून इतर यंत्रे ही मध्य रेल्वेच्या इतर विभागांमध्ये बसवली जातील.
नवीन काय?
या नव्या यंत्रांमध्ये टच स्क्रीनची सुविधा अधिक उत्तम असेल. याआधीच्या यंत्रांमधील टच स्क्रीनबाबत प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत ही सुधारणा करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे या नव्या यंत्रांमधील प्रिंटरही अधिक चांगला असेल. प्रवाशांच्या सूचनांचा विचार करून यात आवश्यक ते बदल करण्यात आल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
‘सीसीओ-एटीव्हीएम’पेक्षा
साधी एटीव्हीएमच बरी
सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे एक कॅश अॅण्ड कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम बसवले आहे. या यंत्रात पैसे टाकून प्रवाशांना तिकीट काढता येते. मात्र या यंत्रात टाकलेले पैसे मोजा, ते वेगळे करा, बँकेत भरा या सर्व खटपटी रेल्वेला कराव्या लागतात. एटीव्हीएम यंत्रामध्ये हा खटाटोप करण्याची गरज नसते. स्मार्टकार्डमध्ये असलेल्या बॅलेन्सच्या आधारे प्रवासी तिकीट खरेदी करतात. त्यामुळे थेट रोख रकमेचा प्रश्न येत नाही. त्यामुळे रेल्वेसाठीही ही यंत्रे अधिक सोयीची असल्याचे पाटील यांनी सांगितले.