जिल्ह्यातील एकूण अकराशेहून अधिक गावांचा टंचाईग्रस्त म्हणून समावेश झाला असला तरी सद्यस्थितीत १४८ गावांमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या गावांना १३६ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात जवळपास ४०० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जळगाव शहरासाठी विशेष योजना कार्यान्वित झाल्यामुळे दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे.
१९७२ च्या दुष्काळाने महाराष्ट्राला तीव्र झळा दिल्या होत्या. त्यापेक्षा भीषण स्थिती यंदाची सांगितली जाते. राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत जळगावचाही समावेश आहे. जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा तालुकावगळता ११०० हून अधिक गावे शासनाने टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. सद्यस्थितीत जामनेर तालुक्यास बिकट स्थितीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४८ गावांमध्ये १३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हे टँकर दररोज सुमारे ५०० फेऱ्या मारत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. पाणीटंचाईचे भीषण संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. त्यात विहिरींचे अधिग्रहण व तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. या संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने इतर संस्थांना आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देऊन जळगाव व जनता बँक, जळगाव पीपल्स बँक, बाजार समितीने सामाजिक बांधीलकीतून पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर धरणातील उपयुक्त जलसाठा शून्यावर आला असताना मृत साठय़ातून पाच लाख लोकसंख्येच्या शहराची तहान भागविली जात आहे. आता मृतसाठा उचलण्यासाठी महापालिकेने विशेष पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. महापौर किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून साकारल्या गेलेल्या या योजनेमुळे तीव्र टंचाईच्या स्थितीतही शहराला दोन दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्याचे योग्य नियोजन होत असल्याने ऑगस्टअखेपर्यंत पाणी पुरेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader