‘गुरुकुल आयुर्वेद फार्मसी’च्या वतीने देशभरात चार हजार ‘आरोग्यधाम’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गुरुकुलचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्यधामच्या माध्यमातून लोकांना आयुर्वेद औषधासोबतच आता उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गुरुकुल आयुर्वेदचे सध्या बाजारात १४० पेक्षा अधिक उत्पादने आहेत. यात पुन्हा नवीन उत्पादनांची भर घातली जाणार आहे. यासोबतच १२ सुपर वितरण व ६० वितरकांची निवड केली जाणार आहे. सध्या गुरुकुल आयुर्वेद फार्मसीचा व्यवसाय हा ८० कोटींचा आहे, परंतु येणाऱ्या पाच वर्षांत तो ५०० कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी मुख्य वितरक व आयुर्वेद औषधालयांची स्थापना करण्यात येणार आहे. याशिवाय युके, यूएई, यूएसए व युरोपीयन देशातही गुरुकुल आपले कार्यक्षेत्र वाढवणार असल्याचे सुरेंद्रकुमार यांनी सांगितले.
गुरुकुल फार्मसीच्या उत्पादनात प्रामुख्याने वटी, क्वाथ, चूर्ण, च्यवनप्राश, सर्वहितकारी रस, रक्तिमा, कारल्याचा रस, एनर्जी पावडर, मधुमेहनाशिनी वटी, अ‍ॅलोव्हेरा ज्युस, चंद्रप्रभा वटी, आवळा रस, आवळा कॅन्डी, हर्बल चहा, मुरब्बा, गुरुकुल रसायन व ब्रह्मचर्यवर्धक चूर्ण उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, हरिद्वार येथील गुरुकुल महाविद्यालयातर्फे विद्याभूषण, विद्यारत्न, विद्यानिधी व विद्याभास्कर या अभ्यासक्रमासह पॉलिटेक्निक,
एमबीए, बीबीए, बीसीए व बी.एड. सारखे अभ्यासक्रम चालवले जात असून यात सुमारे ५०० विद्यार्थी शिकत आहेत. पत्रकार परिषेदला पश्चिम क्षेत्राचे व्यवस्थापक संजयकुमार टाले, विदर्भाचे मुख्य वितरक संतोष तिवारी, छत्तीसगडचे मुख्य वितरक कमलेश खानचंदानी व दीपक माहेश्वरी उपस्थित होते.