दिवाळीच्या तोंडावर चोरटय़ांनी शनिवारी भरदिवसा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल ४२ लाखांच्या ऐवजाची लूट केली. एकाच दिवशी या मोठय़ा चोऱ्या करून चोरटय़ांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. दोन्ही चोऱ्या शहराच्या भरवस्तीच्या ठिकाणी झाल्या. यातील पहिल्या घटनेत सिडको भागात रोख रकमेसह ३१ लाख ४३ हजारांचे दागिने लुटण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत बाबा पेट्रोलपंपावर डिझेल भरत असताना वृद्धाच्या दुचाकीतून ३४ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरटय़ाने लांबविली.
शहरातील सिडको भागात शनिवारी सकाळी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरून चोरटय़ांनी ३१ लाख ४३ हजार रुपयांचा माल चोरून नेला. विशेष म्हणजे पहिल्या मजल्यावर ही चोरी झाली, तेव्हा घरातली मंडळी तळमजल्यावर होती. परंतु चोरी झाल्याचे कोणाच्याही लगेच लक्षात आले नाही. ऐन दिवाळीत चोरटय़ांनी अशा प्रकारे हात साफ करून घेतला. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली. श्वानपथक मागविले होते. परंतु उपयोग झाला नाही. दरम्यान, शहरात चोरटय़ांनी चांगलाच उच्छाद मांडला असून, लहान-मोठय़ा चोऱ्यांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेपुढे तपासाचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांमध्ये आता वाढती नाराजी व्यक्त होत आहे. मुरली चोपणदास राणी (प्लॉट नं. २८३, एन ३, सिडको, औरंगाबाद) यांच्या घरी शनिवारी सकाळी साडेसहा ते दहाच्या दरम्यान कधी तरी ही चोरी झाली. रोख दहा लाख रुपयांसह मोठय़ा प्रमाणात सोन्याचे दागदागिने मिळून एकूण ३१ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. चोरटय़ांनी राणी यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश मिळविला व आत असलेल्या लाकडी कपाटातील हा ऐवज लुटून पोबारा केला. ही चोरी झाली त्यावेळी राणी कुटुंबीय तळमजल्यावर झोपले होते. त्यामुळे वरच्या बाजूला चोरी होत असल्याचे घरात कोणाच्याही लगेच लक्षात आले नाही. रोख १० लाख रकमेशिवाय लूट झालेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये ३ तोळ्यांच्या बांगडय़ा, ५ तोळे मणिमंगळसूत्र, ३ तोळे नेकलेस, २ तोळे पँडल, ३ तोळे बदक (१५ नग), लहान मुलांच्या ५ ग्रॅमच्या ५ अंगठय़ा, सहा ग्रॅमच्या लेडीज अंगठय़ा, पाच तोळ्यांचे २ ब्रेसलेट याचा समावेश आहे.
बाबा पेट्रोलपंपावर ३४ तोळे लुटले
दुसऱ्या घटनेत दुपारी बाराच्या सुमारास बाबा पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यास आलेल्या अनंत सदाशिव पुराणिक (वय ६३, समर्थनगर, औरंगाबाद) यांना चोरटय़ाने हिसका दाखवला. पुराणिक हे आपल्या मोटारीत डिझेल भरण्यास पंपावर थांबले होते. या वेळी गाडीत डिझेल भरले जात असताना चोरटय़ाने पुराणिक यांच्या गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेली बॅग लांबविली. बॅगमध्ये ३४ तोळे सोन्याचे दागिने होते. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत १० लाख २५ हजार ५०० रुपये होते. क्रांतिचौक पोलिसांनी या बाबत नोंद केली. अत्यंत गजबजलेल्या या चौकात पोलिसांची नेहमी वर्दळ असते. तसेच चौकात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. मात्र, हे सर्व असताना चोरटय़ाने डाव साधला. त्यामुळे पोलिसांपुढे चोरटय़ांनी तपासाचे तगडे आव्हान उभे केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा