फेब्रुवारी व मार्चमध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने जिल्हय़ात केळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठय़ा नुकसानीस सामोरे जावे लागले. जिल्हय़ातील ४४८ केळीउत्पादक शेतकऱ्यांना ८७ हेक्टर ३५ आर जमिनीवरील ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीबाबत हेक्टरी ८ हजार रुपयांप्रमाणे भरपाई मिळणार आहे. गारपिटीमुळे सन २०११मध्ये केळीबागांचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी ६९ लाख ६ हजार रुपये भरपाईची रक्कम कृषी अधीक्षक कार्यालयात जमा झाली. नुकसानभरपाईची रक्कम पात्र ४४८ शेतकऱ्यांना मिळेल. चालू वर्षांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही भरपाई मिळणार असल्याचे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांनी सांगितले. यंदा फेब्रुवारी व मार्चमध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हिंगोलीतच नाही, तर राज्यात १७ जिल्हय़ांतील शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. या पाश्र्वभूमीवर शिष्टमंडळाद्वारे वनमंत्री पतंगराव कदम यांची भेट घेऊन अर्थसाहाय्याची मागणी करण्यात आली. यात फळपिकासाठी हेक्टरी १० हजार रुपये, तर इतर पिकांसाठी हेक्टरी ५ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे आमदार सातव यांनी सांगितले.