गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेल्या सराला बेटाचा धार्मिक पर्यटन विकासाच्या कामाला प्रारंभ झाला असून सुमारे ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानने सेंद्रीय शेती सुरू केली असून सेंद्रीय गुळाचीही निर्मिती सुरू केली आहे.
महंत नारायणगिरी महाराज यांची पुण्यतिथी बुधवार दि. ३ रोजी सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र सराला बेट येथे संपन्न होत असून महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. यावेळी भाविकांना नांदगाव, येवला, चांदवड, वैजापूर, कोपरगाव भागातील भाविक मांडे व पोळ्यांचा महाप्रसाद देणार आहेत. या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सेंद्रीय शेतीचे धडे मिळणार आहेत. तसेच त्यांच्याकरीता सेंद्रीय गुळ व कहाकी वाजवी दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गंगागिरी महाराज हे धार्मिक वृत्तीचे होते. ते भजन करीत. पंढरपूरला िदडय़ा काढत. ब्रम्हचारी असलेले गंगागिरी महाराज यांना गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेले सराला बेट ध्यानधारणा व तपाकरीता आवडले. बेटाची मालकी बचराल सेठ या सावकाराकडे होती. त्यांनी ध्यानधारणेकरीता थोडी जमिन मागितली. पण बचराल सेठ यांनी ६५ एकर क्षेत्राचे बेटच देऊन टाकले. तसेच भाविकांनी अन्य गावात जमिन दिली. संस्थानकडे आता २५४ एकर जमिन आहे. पूर्वी फ़ारच कमी जमिन कसली जात होती. ती लागवडीलायक नव्हती. पण रामगिरी महाराजांनी संस्थानचे उत्पन्न वाढविण्याकरीता शेती विभाग सुरू केला. आता जमिनीचे सपाटीकरीण करण्यात आले आहे. संस्थानने २५ एकर सेंद्रीय पद्धतीने ऊस पिकवला. ज्वारी बाजरी ही सेंद्रीय पद्धतीने पिकवली जाते. तसेच गुळही तयार केला आहे. भाविकांमध्ये सेंद्रीय शेतीबद्दल आवड तयार व्हावी म्हणून हा उपक्रम संस्थानने हाती घेतला आहे.
सराला बेटावर जाण्याकरीता पूर्वी एकही बस नव्हती. पण आता श्रीरामपूर आगारातून पूर्वीची गोवर्धन बस मुक्कामी सराला बेटावर नियमित नेली जाणार आहे. त्याचा शुभारंभही बुधवार दि. ३ रोजी होणार आहे. सराला बेटाला तीर्थक्षेत्र विकासात क क्रमांकाचा दर्जा आहे. राज्य सरकारने त्याकरीता ३० लाखाचा निधी मंजूर केला असून आमदार भाऊसाहेब कांबळे व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रत्येकी १० लाख रुपयाचा निधी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पर्यटन विकासाकरीता साडे तीन कोटीची विकास कामे मंजूर केली आहेत. त्या कामास प्रारंभही झाला आहे. सुमारे ४५ कोटीचा विकास आराखडा संस्थानने तयार केला आहे. बेटाच्या चारही बाजुने बांबुची लागवड करण्यात आली असून नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपन केले जाणार आहे. भक्त निवास, बगिचा, ध्यानधारणा व्यवस्था, वारकरी शिक्षण, गोशाळा आदी विविध उपक्रमाचे नियोजन संस्थानने केले आहे.
गंगागिरी महाराज यांनी हरिनाम सप्ताह सुरू केला. यंदाचे १६५वे वर्ष सप्ताहाचे आहे. सप्ताहात लाखो भाविकांची उपस्थिती व त्यांना महा प्रसाद दिला जातो. राज्यातील हा सर्वात मोठा सप्ताह असून पुणतांबे येथे सप्ताह घेणा ऱ्या गावाचे नाव जाहिर केले जाते. गंगागिरी महाराजांनंतर हरिगिरी, नाथगिरी, सोमेश्वरगिरी व महंत नारायणगिरी यांनी संस्थानचा कारभार पाहिला. पुढील वर्षी २०१४ मध्ये गंगागिरी महाराज यांची २०० वी जयंती साजरी केली जाणार असून त्याच्या तयारीला संस्थान आतापासूनच लागले आहे. संस्थानचा शिस्तबद्ध विकास केला जात असून धार्मिक पर्यटनाचे राज्यातील एक महत्वाचे केंद्र महंत रामगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले जात आहे.