सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि त्यातून येणारे नैराश्य यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत असल्याची बाब सर्वानाच माहीत आहे. जीवनाला कंटाळून मृत्यू पत्करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतेकांनी विष प्राशन करण्याचा मार्ग स्वीकारल्याची बाब हाती आलेल्या माहितीवरून स्पष्ट झाली आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक असून, त्यातही मरण पावलेले बहुतांश शेतकरी विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ांतील आहेत. विहिरीत उडी मारून, विष पिऊन किंवा गळफास लावून या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातही, शेतातील पिकावर फवारणीसाठी सहज उपलब्ध असलेले कीटकनाशक पिऊन मरण पत्करण्याचा त्यातल्या त्यात सोपा मार्ग शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचे मिळालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. ही माहिती नागपूर जिल्ह्य़ातील आहे.
१ जानेवारी २०१० ते २० नोव्हेंबर २०१३ या कालावधीत नागपूर जिल्ह्य़ात किती जणांनी आत्महत्या केल्या, अशी विचारणा अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली केली होती. या कालावधीत नागपूर जिल्ह्य़ात ६४ जणांनी आत्महत्या केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या सर्वाना शासनाच्या नियमानुसार प्रत्येकी १ लाख रुपये मदत देण्यात आली आहे. ज्यांनी नापिकी किंवा कर्जबाजारीपणा यासारख्या कारणामुळे आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले, त्यांनाच ही मदत देण्यात येते. याचाच अर्थ ज्यांच्या बाबतीत हे सिद्ध होऊ शकले नाही अशाही अनेकांनी आत्महत्या केल्या असल्या, तरी त्यांचा या आकडेवारीत समावेश नाही.
आत्महत्या केल्यानंतर शासकीय मदत मिळालेल्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी नरखेड तालुक्यातील असून सावनेर, काटोल, भिवापूर, उमरेड, कळमेश्वर, रामटेक, कुही इ. तालुक्यांमधील शेतकऱ्यांचाही यादीत समावेश आहे. यापैकी सर्वाधिक, म्हणजे ४५ जणांनी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्यांची संख्या १३ असून सहाजणांनी गळफास लावून आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये २४ वर्षांपासून ७० वर्षांपर्यंतचे शेतकरी आहेत.
याच कालावधीत कितीजण अपघातात मरण पावले, असेही कोलारकर यांनी विचारले होते, परंतु ही माहिती या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांनी किंवा अपघातग्रस्त लोकांनी किती प्रस्ताव सादर केले, त्यापैकी किती मंजूर झाले आणि त्यापोटी आतापर्यंत किती रक्कम देण्यात आली असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून अद्याप आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव सादर न झाल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा